शिर्डी - वंचित बहुजन आघाडीने शिर्डी मतदारसंघातील उमेदवार डॉ. अरुण साबळे यांची उमेदवारी अचानक रद्द केली आहे. नेवासे येथील आंबेडकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय सुखदान यांना आता उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
तांत्रिक अडचणीमुळे डॉ. साबळे यांना आपली उमेदवारी गमवावी लागली आहे. त्यांनी यापूर्वी सरकारकडे पूर्ववत पदावर रुजू होण्याकरीता अर्ज दाखल केला होता. त्यावर सरकारकडून नुकतीच कार्यवाही करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी ही बाब वंचित बहुजन आघाडीला माहीत नव्हती. आता उशिराने हा प्रकार लक्षात आल्याने तांत्रिक अडचण लक्षात घेऊन नाईलाजास्तव उमेदवार बदलावा लागत आहे, अशी माहिती आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. जालिंदर घिगे यांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीने शिर्डी येथे डॉ.साबळे यांची उमेदवारी जाहीर केली होती. शिर्डीत सर्वप्रथम आघाडीनेच आपला उमेदवार घोषित केला होता. डॉ. साबळे हे शासकीय रुग्णालयातील सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक आहेत. ते राहाता येथे व्यवसाय पाहत होते. त्यांनी अकोले, संगमनेर येथे काही काळ नोकरी केली होती.
नेवासे येथील सुखदान हे गेली अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीतील एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मंगळवारी दुपारी सुखदान हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष पी. डी. सावंत, किसन चव्हाण, किरण साळवी आदी उपस्थित राहणार आहेत.