शिर्डी : नाताळाच्या सुट्टी दरम्यान शिर्डीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे. त्या अनुषंगाने भक्तांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी साई संस्थानने (Sai baba Sansthan) जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे रुग्ण वाढू लागल्याने साईभक्तांनी शिर्डीत येताना मास्कचा वापर, सोशल डिस्टसींग तसेच सॅनीटायझरचाही वापर करावा, (use mask in Sai temple) असे आवाहन साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी आधिकारी राहुल जाधव (Rahul jadhav) यांनी केलं आहे.
दहा लाख भाविक येण्याचा अंदाज : साईभक्तांची नविन वर्षाला होणारी गर्दी लक्षात घेता नविन वर्षाच्या सुरुवातीला सर्व भक्तांना साईबाबांचं दर्शन मिळावं यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री साई मंदीर खुलं ठेवण्याचा निर्णय साई संस्थाने घेतला आहे. भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानच्या वतीने सर्व चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी अनेक जण नाताळच्या सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देत नविन वर्षाची सुरवात साईबाबांच्या दर्शनाने करतात. मात्र मागच्या वर्षी कोविडची बंधने असल्याने भक्त शिर्डीत येवू शकले नाहीत. मात्र या वर्षी दहा दिवसात अंदाजे दहा लाख भाविक शिर्डीला येतील असा अंदाज साई संस्थान कडून व्यक्त करण्यात आला आहे.