अहमदनगर - अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नाट्य संमेलन अहमदनगरमध्ये होणार आहे. त्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होते. ही पत्रकार परिषद सुरू असताना बाहेर उभी असलेल्या प्रसाद कांबळी यांच्या चारचाकीच्या खिडकीची काच अज्ञातांनी फोडली आहे. यामागे चोरीचा उद्देश होता, की शरद पोंक्षेंना विरोध करणे हा हेतू होता याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
या पत्रकार परिषदेसाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, मुख्य कार्यवाह शरद पोंक्षे, सतीश लोटके, दिगंबर प्रभू, अशोक नारकर, सतीश शिंगटे, अमोल खोले, शशिकांत नजन आदी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी वादग्रस्त व्यक्त वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केले होते. त्यावरून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठा वाद उफाळला होता. या वक्तव्यामुळे महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांचा अवमान झाल्याची भावनाही बहुजन समाजात होती. त्यातून सोशल मीडियात पोंक्षे यांच्याविरूद्ध राग व्यक्त केला जात आहे. पोंक्षे हे वादग्रस्त वक्तव्य करून जातीजातीत तेढ निर्माण करतात, असाही त्यांच्यावर आरोप होत असतो. याच रागातून पोंक्षे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची चर्चा आहे.
पत्रकार परिषद संपल्यानंतर नाट्य परिषदेचे पदाधिकारी बाहेर आले. त्यावेळी त्यांना गाडीची काच फुटलेली दिसली. त्यामुळे ही चर्चा वाऱ्यासारखी शहरात पसरली. काहींनी लगेच सोशल मीडियात कमेंट सुरू केल्या. या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नव्हती.
चोरीचा उद्देश असावा..
दगडफेक झालेली गाडी ही शरद पोंक्षे यांची नसून ती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची आहे. गाडीत त्यांची बॅग होती. त्यामुळे चोरीच्या उद्देशानेच कोणीतरी गाडीची काच फोडली असावी, असा खुलासा अहमदनगरचे नाट्यकर्मी सतीश लोटके यांनी केला आहे. पोंक्षेंसंदर्भातील वादाची याला पार्श्वभूमी नसावी, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - महिला दिन विशेष : शिक्षण नाही म्हणून 'ती'ने जीवनाची गाडी थांबवली नाही; तर...