अहमदनगर - जिल्ह्यातील पाथर्डी-बीड या रोडवर आज (शुक्रवार) सकाळी मोटरसायकलवरून बीडकडे जाणाऱ्या तीन जणांना या रस्त्यावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थेट ओढ्यात पडली. यावेळी ओढ्यात पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने त्यात तिघेजण वाहून गेले. यात दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी अवस्थेत नागरिकांना सापडला. आनंदा जगधने (वय 25) आणि दीपक धोत्रे (वय 32) अशी मृतांची नावे आहेत. तर, राजेंद्र वाघ (वय 28) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पाथर्डी-बीड मार्गावर अनेक ठिकाणी सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत. अशाच एका ओढ्यावर पुलाचे काम सुरू असताना आज सकाळी हे तीन युवक मोटरसायकलवरून बीडच्या दिशेने जात होते. मात्र, याठिकाणी त्यांना अंदाज न आल्याने त्यांची मोटरसायकल थेट ओढ्यात घसरली आणि पाण्याच्या प्रवाहात हे तिघेजण वाहत गेले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी अवस्थेत नागरिकांना सापडला. त्याच्यावर पाथर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाथर्डी-बीड रस्त्यावर सुरू असलेल्या दुरुस्तीचे काम त्याचबरोबर पुलांच्या दुरुस्तीची काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वी अनेकदा या रस्त्यावर अपघात झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा - जाणून घ्या... असा साजरा होईल यावर्षीचा साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव