शिर्डी(अहमदनगर) - संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आणि विधानसभेत गाजत असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण अपहरण आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. दोन आरोपींकडे सबळ पुरावे मिळाल्याचा दावा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली. पोलिसांनी मात्र हत्येचे कारण स्पष्ट केले नाही. तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
हेही वाचा - शेतकऱ्यांना कृषी वीजबिलात मिळणार ३३ टक्के सवलत
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरणाचा आणि हत्येचा तपास लागत नसल्याने त्यांचे नातेवाईक आणि बेलापूर ग्रामस्थ तसेच व्यापारी वर्गात मोठा रोष पाहायला मिळत आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका नातेवाईकांनी घेतली होती. मात्र, विभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी लवकरच प्रकरणाचा तपास लावू असे आश्वासन दिल्यानंतर मृत गौतम हिरण यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
दरम्यान, हत्येच्या निषेधार्थ आज बेलापूर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. 1 मार्च रोजी गौतम हिरण यांचे अपहरण झाले होते. काल श्रीरामपुर एमआयडीसी परिसरात निर्जनस्थळी त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. तोंड ठेचून त्यांची निर्घुण हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. अपहरण झाल्यानंतर हिरण यांचे नातेवाईक आणि व्यापारी वर्गाने पोलिसांना तपासासाठी अनेकदा लक्ष घालण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी वेगाने तपास केला नाही असा आरोप नातेवाईक आणि व्यापा-यांनी केला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करत गृह विभागावर निशाणा साधला होता.आज भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही गृह विभागाच्या कामावर सडकून टीका करत घटनेचा उलगडा करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत दोन आरोपींना अटक केल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींकडे सबळ पुरावे मिळाल्याचा दावा पाटील यांनी करत लवकरच सर्व आरोपी अटक होतील, अशी माहिती दिली.
विधानसभेत या हत्येप्रकरणी तीन वेळेस चर्चा झाल्यानंतर आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी हत्येमागील कारण अद्यापही समोर आले नाही. ही हत्या व्यवसायिक वादातून झाली की अन्य कारणामुळे याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण हे समोर आणावे अशी मागणी नातेवाईक आणि व्यापारी करतात.
हेही वाचा - मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एएनआयकडे देण्यामागे नक्कीच काळंबेरं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे