शिर्डी (अहमदनगर) - चंदीगड येथील तृतीयपंथी समाजाच्या साईभक्त सोनाक्षी व त्यांच्या १० सहकार्यांनी श्री साईबाबा संस्थानला भेट देत साई समाधीचे दर्शन घेतले आहे. पंजाबातून आलेल्या या तृतीयपंथींनी साई मंदिराला ११ लाख रुपये रोख देणगी दिली आहे. यावेळी त्यांना दर्शन आरतीचा मोफत पास देण्यात आला मात्र त्यांनी त्याला नम्र नकार देत सर्वसामान्य साई भक्तांसोबत दर्शनरांगेत उभे राहाणे पसंत केले.
दर्शन आरती मोफत पासला नकार
साईभक्त सोनाक्षी व त्यांच्या १० सहकारी म्हणाल्या की, आम्ही चंदीगड येथून अनेक ठिकाणी भेट देत-देत शिर्डी येथे आलेलो आहोत. साईबाबांचे दर्शन घेऊन आम्हाला आत्मीक शांती मिळाली. आम्हाला या ठिकाणी चांगली शिस्त बघायला मिळाली. साईबाबा संस्थानच्यावतीने कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगल्याप्रकारे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सर्व साईभक्त मास्कचा वापर व दोन व्यक्तींमध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करताने दिसत आहेत. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी त्यांचे स्वागत केले.
संस्थानच्यावतीने कोव्हीड-१९ च्या पार्श्वभुमीवर केलेली व्यवस्था ही साईभक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताची असून सर्वांनी नियमांचे पालन करुन साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे सांगुन लवकरच कोरोनाचे सावट संपावावे अशी प्रार्थना ही सोनाक्षी व त्यांच्या सहकार्यांनी साईचरणी केली. साईभक्तांनी देणगी दिलेली असल्याने संस्थानकडून दर्शन आरतीचा मोफत पास उपलब्ध असूनही त्यांनी त्यास नम्रपणे नकार देऊन सर्वसामान्य भक्तांच्या मार्गानेच दर्शनरांगेतून दर्शन घेणे पसंत केले.
साईबाबाच्या चरणी १४ दिवसांत सव्वा तीन कोटींची देणगी
शिर्डी येथील साई मंदिरात भक्तांचा ओघ कायम आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात झालेल्या देणगीची मोजणी करण्यात आली. दक्षिणा पेटीत ३ कोटी १६ लाख ८३ हजार ९८० रुपये रोख स्वरुपात जमा झाले आहे. याशिवाय ९३ ग्रॅम सोने, ३८०८ ग्रॅम चांदी भक्तांनी साई चरणी अर्पण केले आहे. मागील १४ दिवसांत साईंच्या दरबारात अडीच लाख भाविकांनी हजेरी लावली. येथे आलेल्या भक्तांनी दानपेटीत जमा केलेल्या दक्षिणेची मोजणी मंगळवारी करण्यात आली आहे.