अहमदनगर - शनिशिंगणापूर येथे चारशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच स्वयंभू शनिमूर्तीला कावडीचे पाणी न घालता जत्रा रद्द करण्यात आली. तसेच गुढीपाडवा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
कावडीचे स्वागत, मिरवणूक आणि भाविकांना दरवर्षी बेसन-पुरीचा महाप्रसाद वाटप होत होता. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा विभागाने काशी येथून आलेल्या कावडीतील जल न वापरण्याचा निर्णय घेतला. आज मंदिरातील मुख्य पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगेच्या पाण्याने स्वयंभू शनिमूर्तीला अभिषेक घालण्यात आला. देवाला
साखरेच्या कडेगाठीची माळ घालण्यात आली. महंत त्रिबंक महाराज यांच्या हस्ते साडेदहा वाजता आरती सोहळा झाला. शनिचौथरा परिसरात ग्रामस्थ व भाविकांना प्रवेश नव्हता. सर्वत्र जमावबंदीचा आदेश असल्याने मंदिराकडे दिवसभरात कोणीच फिरकले नाही.