अहमदनगर - उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने परिसरातील सर्व धबधबे सुरू झाले आहेत. त्यामुळे रंधा फॉल, अम्ब्रेला फॉल या सर्वच ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाली आहे. तर पुणे, नाशिक, मुंबई, गुजरात राज्यातून निसर्गाचे देखणे रुप पाहण्यासाठी आतापर्यंत १ लाखहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी नटलेल्या अकोले तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्याने सर्वच ठिकाणी हिरवळ आणि रम्य वातवरण निर्माण झाले आहे. देवठाण जवळील तवा धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत असून याठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील घारगांव परिसरात संततधार पावसामुळे कळमजाई मातेचा धबधबा सुरु झाला आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून ४ किमी अंतरावर असलेल्या कळमजाई माता पर्यटनस्थळ आहे. येथे कळमजाई मातेचे अतिशय पुरातन काळातील मंदिर असून हे मंदिर गुहेमध्ये आहे. त्याची निर्मिती पांडवांनी केली, अशी आख्यायिका सांगितली जाते. गुहेतील दगडी भिंतीतच पांडवांनी देवीचे कोरीव सुबक मूर्ती कोरलेली आहे. या देवस्थानला पर्यटनस्थळ दर्जा मिळाल्याने अलिकडच्या काळात वनविभागाकडून विविध विकास कामे करण्यात आलेली आहेत. येथील संपूर्ण परिसर हिरवाईने नटला असून येथे बिबटे, मोर, लांडगे, तरस, वानर आदी वन्यप्राणी येथे आढळतात. त्याचबरोबर विविध औषधी वनस्पतीही याठिकाणी पाहावयास मिळतात.