अहमदनगर Tomato Rate Decreased : दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला उच्चांकी भाव मिळाले होते. मात्र आता याच टोमॅटोला अवघा तीन ते चार रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत, अशी व्यथा संगमनेर तालुक्यातील माहुली येथील शैलेश गाडेकर या टोमॅटो उत्पादक शेतकर्याने मांडली आहे.
टोमॅटोच्या दरात घसरण : संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या माहुली येथील शैलेश गाडेकर यांनी टोमॅटोला चांगला बाजारभाव असल्याने जुलै महिन्यात जवळपास एक एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर टोमॅटो रोपांची लागवड केली होती. त्यातच पाणी टंचाई असताना देखील त्यांनी टोमॅटो पिकाची चांगली काळजी घेतली. टोमॅटो हंगाम सुरू होऊन दहा ते बारा दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र, आता याच सोन्यासारख्या टोमॅटोला अवघा तीन ते चार रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे गाडेकर यांनी डोक्यालाच हात लावला आहे. झालेला खर्चही वसूल होतो की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विकतच्या पाण्यावर पिकं जगविण्याची वेळ : दोन महिन्यांपूर्वी याच टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळत होता. म्हणून या आशेवर टोमॅटो पीक घेतलं. पण बाजारभाव कोसळल्याने टोमॅटो पिकावर झालेला सर्व खर्च अंगलट येणार आहे अशी व्यथाही शैलेश गाडेकर या तरुण शेतकर्याने मांडली आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. अशा कठीण परिस्थितही पिंपळगाव देपा खंडेरायवाडी आदी गावांमधील शेतकर्यांनी खासगी टॅंकरव्दारे विकतचे पाणी आणून टोमॅटोचे फड जगवले आहेत. पण टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळू लागल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
पिकावरील खर्चही वसूल होणार नाही : पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही चांगले बाजारभाव मिळतील म्हणून टोमॅटोचे पीक घेतले. मात्र आज याच टोमॅटोला मार्केटमध्ये प्रतिकिलोस तीन ते चार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. यामुळे टोमॅटो पिकावर झालेला खर्चही वसूल होणार नसल्याचं शेतकरी शैलेश गाडेकर म्हणाले आहे.
हेही वाचा:
- Farmer Success Story : टोमॅटोसह झेंडू विकुन शेतकरी तीन महिन्यांत झाला कोट्याधीश, वाचा प्रेरणादीय स्टोरी
- Tomato Crop Uprooted : शेतातील टोमॅटोचे पीक अज्ञाताने उपटून फेकले, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
- Tomato Theft Kolhapur : आता टोमॅटोही बँक लोकरमध्ये ठेवण्याची आली वेळ; महाग झाल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ