पाथर्डी (अहमदनगर) - पाथर्डी तालुक्यातील जाणारा निर्मल नांदेड विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्णपणे ठप्प झाले आहे. तरीही खरवंडी कासार येथील टोलनाका करण्याचा शुभारंभ करण्याचे नियोजन ठरले कसे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करु लागले आहेत. यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की निर्मल-नांदेड-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग २२२ आता पुनर्ररचित ६१ राष्ट्रीय महामार्गचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. निकृष्ठ दर्जाचे काम करत असल्याने पुर्वीच्या जेडीसिएल कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा नवीन कामाच्या निवीदा मागवून सोलापूर येथील ठेकेदारास काम सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तरीसुद्धा पाथर्डीपासुन ते फुंदेटाकळीपर्यंत २८७ ते ३३७ लांबीचे काम अत्यंत निकृष्ठ असून पाथर्डी शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आणि पाथर्डी ते फुंदेटाकळी पर्यंत रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
आजतागायत या राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांमुळे अनेक निष्पाप नागरिकांनी जीव गमावला आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दर तीन महिन्यांनी बदलले जातात. पाथर्डी तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी ठेकेदारांशी संगणमत करुन आर्थिक टक्केवारी ठरवुन महामार्गाचे काम निकृष्ठ करण्यास सांगतात, अशा चर्चा नागरिकांमधे आहेत. यावरुन निर्मल नांदेड विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण कधी होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. तरीसुद्धा खरवंडी कासार येथील टोलनाका करण्याचा शुभारंभ ठरला आहे.
जर टोलनाका सुरु करुन टोल वसुली केली तर सर्वसामान्य नागरीकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. यामुळे जोपर्यंत निर्मल नांदेड विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग पाथर्डी शहरापासून ते फुंदेटाकळी पर्यंत काम पुर्ण करत नाहीत, तोपर्यंत टोल सुरु करण्यात येऊ नये, अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.
पाथर्डी शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून ते फुंदेटाकळीपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे निर्मल-नांदेड-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गचे काम टोल वसुली सुरू करण्यापूर्वी करावे, अन्यथा टोलवसुलीविरोधात खरवंडी कासार राष्टीय महामार्गावर आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शिक्षक नेते मिथुन डोंगरे यांनी दिली.