अहमदनगर - साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे, असे शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले. केसकर यांनी सहकुटुंब शिर्डी येथे येऊन साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
साईबाबांनी आपल्या हयातीत कधीच जात, धर्म, पंथ आणि जन्मस्थळाबाबत उल्लेख केला नाही. मानवतेचा पुजारी म्हणून त्यांनी आपले सर्व आयुष्य घातले. त्यामुळे त्यांच्या जन्मस्थळाबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. त्यांचे वास्तव्य शिर्डीमध्ये होते त्यामुळे शिर्डीचे महत्त्व कायम राहणार आहे, असे केसकर म्हणाले.
हेही वाचा - माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, ..म्हणजे मी भारतीय नाही का?
साईबाबांच्या बाबतीत केलेले लिखाण वाचून प्रत्येकाने स्वतः त्यांच्या जन्मस्थळाबाबत अनुमान लावावे. मुख्यमंत्र्यांनी पाथरीला जन्मस्थळाचा दर्जा दिलेला नाही. फक्त एक तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीला विकास निधी दिला असल्याचे केसरकरांनी स्पष्ट केले.