अहमदनगर - शिर्डीचे मनसेचे नगरसेवक तसेच जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते यांच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. यातील एक जण अद्याप फरार आहे. आरोपीकडील एक गावठी पिस्तुल, ३ जिवंत काडतुसे आणि टाटा इंडिगो कार ताब्यात घेतली आहे. आरोपींनी अपहरणाची कबुली दिली असून पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.
मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे २४ मे रोजी मध्यरात्री बाभळेश्वर येथील हॉटेल ग्रीनपार्क समोरुन ४ जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून व्हिस्टा कारमधून अपहरण केले होते. तसेच त्यांच्याकडील ४० हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतले होते. त्यानंतर राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी शिवारात उतरवून दिले. शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यपदाच्या निवडीवरुन अपहरण झाल्याचा संशय कोते यांना होता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी कोते यांच्या तक्रारीवरुन लोणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक इशु सिंधू यांनी गुन्ह्याचा तपास लवकर करण्याच्या सूचना दिल्या.
अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.दिपाली काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू होता. त्यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी आयाज मिर्झा यास श्रीरामपूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने या गुन्ह्याची कबुली देत अक्षय गोसावी, नितीन गायकवाड आणि पंकज गायकवाड (सर्व रा. श्रीरामपूर) हे त्याचे साथीदार असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ अक्षय, नितीन यांना अटक केली. मात्र, चौथा आरोपी पंकज गायकवाड हा फरार झाला.