अहमदनगर- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या ७३ स्त्राव चाचणी नमुन्याचे अहवाल शनिवारी दोन टप्यात प्राप्त झाले. त्यापैकी तिघे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. यात नगर शहरातील दोन जण तर राहाता तालुक्यातील लोणी येथील एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता २० झाली आहे.
बाधित आढळलेल्या व्यक्तीमध्ये नगर शहरातील एक व्यक्ती ७६ वर्षीय तर दुसरी व्यक्ती ३५ वर्षीय आहे. लोणी येथील व्यक्ती ४६ वर्षीय आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने यांना लागण झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले. सुरुवातीला शनिवारी सायंकाळी ७३ पैकी ३५ स्त्राव चाचणी अहवाल पुणे येथून प्राप्त झाले. त्यात, केवळ एक व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. रात्री पुन्हा उर्वरित ३८ स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यात आणखी दोघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले.