अहमदनगर - शहरातील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ, डॉ. जगदीश चहळ यांना ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे अन्वेषण पथकाने धाडसाने पाठलाग करून जेरबंद केले. सदर आरोपींकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि चाकू जप्त केले आहे. खंडणीची रक्कम स्वीकारते वेळी आरोपींनी डॉ. चहळ यांच्याशी झटापट करत गावठी कट्ट्यातून एक गोळी झाडली होती. मात्र, सतत गुप्तपणे मागावर असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने धाडसाने आरोपींवर झडप घालून आणि पाठलाग करून तीनही आरोपींना पकडले.
या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा डॉ. चहळ यांच्याकडेच काही वर्षांपूर्वी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करणारा सुनील कुऱ्हाडे असल्याचे समोर आल्याने, वैद्यकीय क्षेत्रात धक्का बसला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोबाईल फोनवरून डॉ.चहळ यांना ५० लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत डॉ.चहळ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने हुशारीने तपास सुरू केला.
मुख्य आरोपी कुऱ्हाडे हा डॉ. चहळ यांच्या संपर्कात राहून सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होता. मात्र, पोलिसांनी अगदी गुप्तपणे पाळत ठेवली होती. डॉ. चहळ यांना हे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी खंडणीची रक्कम घेऊन बोलावत होते. रविवारी आरोपींनी डॉ. चहळ यांना पुणे रत्यावरील सुपा गावाच्या परिसरात बोलावले. गुन्हे अन्वेषणचे पथक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागावर होतेच.
यावेळी, आरोपींनी डॉ.चहळ यांच्याकडून रकमेची बॅग स्वीकारताना त्यांच्याशी झटापट केली. यात त्यांची सोन्याची चेन हिसकावली. यादरम्यान, आरोपींनी गावठी कट्ट्यातून एक गोळी देखील झाडली. मात्र, मागावर असलेल्या पोलीस पथकाने मोठ्या धाडसाने आरोपींवर झडप घातली. यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून तीनही आरोपींना अटक केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई करत आरोपींना जेरबंद केले. पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.