अहमदनगर- श्रीगोंदा शहरातील (Shrigonda City) एका महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गात बेंचवर बसण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. विद्यार्थ्याला लाकडासह लाथाबुक्यांनी जबर मारहाण करत, त्याचे चित्रीकरण करून, तो व्हिडिओ सोशल माध्यमावर अपलोड करण्यात आला.
दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
टवाळखोरांचा हैदोस शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यातच घडलेल्या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चित्रीकरण करणाऱ्या व घेऊन जाणाऱ्या निळ्या रंगाचा मोपेड गाडीचा पोलिस तपास करत आहेत.
मारहाणीचा व्हिडीओ काढून केला व्हायरल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणाऱ्या घुगल वडगाव येथील विद्यार्थ्याला दिनांक ७ डिसेंबर रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर सिद्धार्थनगर, श्रीगोंदा येथे राहणारे पियुष घोडके आणि रोहित घोडके येथील दोन युवकांनी 'पेट्रोल पंपावर जाऊ, तुझ्याकडे एक काम आहे', असे म्हणत, त्यांच्याकडील मोपेड गाडीवर बसवून नेले. पेट्रोल पंपाशेजारी फॅक्टरी रोड लगत असलेल्या बागेत दोघा आरोपींनी विद्यार्थ्याला दम दिला की, 'बेंचवर बसण्यावरून आमच्या मित्रांशी वाद का घातला? त्यांच्यासोबत का भांडण केले?', असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यामध्ये तो जखमी झाला आहे. 'आमच्या नादी लागला तर तुला श्रीगोंद्यात येणे कठीण करून टाकू', असा दमही त्याला दिला. हे सर्व होत असताना मारहाणीच्या घटनेचे चित्रीकरणही तेथे उपस्थित आरोपींच्या मित्रांनी केले आणि हा मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर टाकण्यात आला.
महाविद्यालय प्राचार्य अनभिज्ञ
वर्गात घडलेल्या घटनेबाबत महाविद्यालयांच्या शिक्षकांना व प्राचार्यांना माहिती नसल्याचे समजते. महाविद्यालयाच्या कार्यक्षेत्रात अशा गंभीर घटना घडत असतांना स्थानिक शिक्षक व त्यांचे प्रशासन काय करते? हाही मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
नितीन आगे प्रकरणाची आठवण
राज्यात गाजलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कॉलेज युवक नितीन राजू आगे (Nitin Aage Murder Case) प्रकरणात नितीन आगे यालाही अशीच बेदम मारहाण झाली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले आहेत.