शिर्डी - केंद्र आणि राज्य सरकारने कालवे भूमिगत होणार नाही, असे सांगितले आहे. पण अकोले तालुक्यातील कालव्याची कामे याच मागणीसाठी अडवून धरण्याची राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते मधुकर पिचडांची भूमिका योग्य नसल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
पिचड ज्येष्ठ नेते असल्याने आम्ही त्यांचा आदर केला. मात्र, निळवंडे कालव्यांच्या कामाच्या संदर्भात त्यांनी घेतलेली दुराग्रही भूमिका चुकीची असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. अगोदरच शासकीय अनास्थेमुळे पाच वर्षे रखडलेल्या कालव्यांना पिचड यांनी राजकीय हेतूने विरोध केला आहे. आता दुष्काळी भागातील जनतेच्या भावना तीव्र झालेल्या असल्याचा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी पिचड यांना देत निळवंडे कालव्यांसंदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
भूमिगत कालवे होणारच नाही त्यासंदर्भातील भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट केली आहे. त्यामुळे अकोले येथून सुरू असलेला विरोध हा राजकीय भावनेतून सुरू आहे. निळवंडे प्रकल्पच मुळात दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी उभारला गेला आहे. सन १९९१ पासून निळवंडे प्रकल्पासाठी अकोले आणि संगमनेरने एकत्रित प्रयत्न केले आहेत, असे असताना अकोले तालुक्यात होणाऱ्या कालव्यांना विरोध करून पिचड चुकीचे वागत असल्याची जाहीर टीका प्रथमच बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. लोकांच्या भावनेचा विषय आहे आणि तेथील जनतेच्या भावना तीव्र आहे. तोंडाशी आलेला पाण्याचा घास हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. दुष्काळी भागातील जनता उद्रेकाच्या तयारीत आहे त्यामुळे अकोले येथून सुरू असलेले कालव्यांचे राजकारण बंद करावे, असेही थोरात म्हणाले.
निळवंडे कालव्यांचे पाणी मिळण्याची आस 182 गावातील लोकांना गेल्या चाळीस वर्षांपासून लागली आहे. जिल्ह्यातील विखे-थोरात-पिचड यांच्या राजकीय वादामुळेच निळवंड्याची कालवे झाली नसल्याचा आरोप नेहमी होत असतो. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहे. राधाकृष्ण विखे़ंचे राजकीय वजन आता युतीच्या पारड्यात गेला आहे तर निळवंडे लाभक्षेत्रातील गावांनी सेनेचे खासदार सदाशिव लोखंडेंना भरभरुन मतदान केले आहे. त्यामुळे आता युती शासनाला आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता निळवंडे कालव्याचे कामे सुरु करावी लागणार आहे. त्यात आता थोरातांनी राजकीय डावपेच टाकत मधुकर पिचड यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दिसून येत आहे.