अहमदनगर - शुक्रवारी एका कोरोना बाधित महिलेची बेडसाठी फरफट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. मात्र, त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे सलग दुसऱ्या दिवशीही बूथ हॉस्टिपलमध्ये बेड नसल्याने या महिलेची बेडसाठी फरफट होताना दिसून आली. यानंतर या महिलेला शनिवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत.
शनिवारी सायंकाळी ही कोरोनाबाधित महिला बेडसाठी बूथ हॉस्पिटलच्या बाहेर ऑक्सिजन घेत पायरीवर बसून प्रतिक्षेत होती. गंभीर बाब म्हणजे महिलेस श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला पायरीवर बसलेल्या अवस्थेत ऑक्सिजन दिला जात होता. ही बाधित महिला महानगरपालकेची कामगार आहे. शुक्रवारच्या फरफटीवर मनपा कामगार युनियनने तक्रार करत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला होता. मात्र, तरीही शुक्रवारी बूथ हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसताना महिलेस जिल्हा रुग्णालयाने का पाठवले? असा प्रश्न या महिलेच्या नातेवाईकांनी विचारला.
शुक्रवारी सहा तास बेडसाठी प्रतिक्षा -
रुग्णालयात अॅडमिट होण्यासाठी ही महिला शुक्रवारी तब्बल सहा तास टेम्पोतून फिरली होती. यानंतर सायंकाळी आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर या बाधित महिलेस शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोविड सेंटर मध्ये दाखल करुन घेण्यात आले.
नंतर जिल्हा रुग्णालयात केले होते भरती -
शनिवारी जिल्हा रुग्णालयाने या महिलेला बूथ हॉस्पिटलच्या कोविड सेंटरला पाठवले. मात्र, बूथ हॉस्पिटलने बेड नसल्याचे कारण दिल्याने ही महिलेला बेडच्या प्रतीक्षेत पायरीवर बसावे लागले. महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रारही नातेवाईंकांनी केली होती.