अहमदनगर - नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने शिर्डीत भाविकांची तोबा गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोनामुळे भाविकांनी शिर्डीत जास्त गर्दी करू नये, असे आवाहन साई संस्थानकडून करण्यात आले आहे. दिवसभरात जास्तीत जास्त बारा ते पंधरा हजार भाविकांनाच दर्शन उपलब्ध करून दिले जाईल, असे संस्थानने सांगितले आहे. आजपासून सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी न होता नियंत्रित गर्दी असल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत दहा हजार साईभक्तांनी दर्शन घेतले आहे.
'ऑनलाइन दर्शन बुकिंग करूनच यावे'
शिर्डीत 24 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे शिर्डीतील सर्वच व्यवस्थांवर अतिरिक्त ताण पडून व्यवस्था कोलमडत असते. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी साई संस्थानने नाताळाच्या सुट्ट्यांत शिर्डीत येताना साईभक्तांनी ऑनलाइन दर्शन बुकिंग करूनच यावे, असे आवाहन केले होते. याचबरोबरीने शिर्डीत दिवसभरात केवळ बारा हजार भक्तांनाच दर्शन देता येईल, असे नियोजनही केले होते. दरम्यान, आज नाताळचा सण आणि सलग सुट्ट्यांचा पहिला दिवस पाहता भाविकांनी नियंत्रित गर्दी केली आहे.
३१ डिसेंबरचा निर्णय काय?
राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात रात्रीच्या वेळी संचारबंदी लावली आहे. याचा परिणाम शिर्डीतील गर्दीवर होतो का, त्याचबरोबर 31 डिसेंबरला रात्रभर साईमंदीर दर्शनासाठी उघडे ठेवायचे की नाही, याबाबत साई संस्थान काय निर्णय घेणार, याकडे भाविकांचे लक्ष लागून आहे.