अहमदनगर - भाजीपाला आणि जनावरांचा आठवडी बाजार सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जामखेड तालुका अध्यक्ष मंगेश आजबे यांच्या नेतृत्त्वाखाली तहसीलदार कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले.
भाजीपाला,जनावरांचा आठवडी बाजार तातडीने सुरू करा -
निवेदनात कष्टकरी, सर्वसामान्य शेतकरी व ज्यांचे हातावर पोट आहे, अशा व्यक्तींसाठी शनिवारचा आठवडी बाजार अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तो जनावरांचा बाजार चालू करणेसंबंधी निवेदन देण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आणि नगर जिल्हा तसेच जामखेड तालुक्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट लेव्हल एकला असल्याने इतर सर्व उद्योग-धंदे, एसटी बसेस आदी व्यवहार सुरळीत सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या असलेला आठवडी बाजार अजून सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे स्वाभिमानीचे आजबे यांनी सांगितले.
आठवडी बाजार बंद असल्याने, खर्च करून पिकवलेला भाजीपाला हा कवडीमोल किमतीने व्यापारी विकत घेतात. तसेच जनावरांचा बाजार बंद असल्याने जनावरांच्या खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. दहा-वीस हजारांचा बैल पाच-दहा हजारात म्हणजे निम्म्या किमतीला विकला जात आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आठवडी बाजारास परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट आणि नुकसान थांबणार असल्याने प्रशासनाने आठवडी बाजारासाठी त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
बाजार समिती, पालिका प्रशासनाशी बोलून निर्णय घेणार -
या निवेदनाची तातडीने दखल घेत तहसीलदार विशाल नाईकवाडी यांनी आठवडी बाजार लवकरात लवकर सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. याबाबत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदार नाईकवाडे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यासह जामखेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचे त्यांनी मान्य करत आठवडी बाजाराबाबत शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जामखेड तालुक्यातील 55 गावे कोरोनामुक्त असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे शनिवारी चक्काजाम आंदोलन; खासदार रक्षा खडसेंची माहिती
शेतकरी उपाशी व्यापारी तुपाशी -
लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला मोठा बसला आहे. शेतात पिकवलेला भाजीपाला, दूध संकलन विस्कळीत झाल्याने याचा फायदा व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात उचलला. कृषी उत्पन्न बाजार समित्या मधील व्यवहार कोरोनाच्या काळात बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी भाजीपाला कमी भावात खरेदी करून ग्राहकांना चढ्या भावाने विकला. यात अन्नदात्या बळीराजाची आर्थिक लूट होऊन आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे. कोरोना काळात दुधाची मागणी घातल्याने त्याचा परिणाम दुधाचे दर कोसळण्यावर झाला. तीच परस्थिती जनावरांच्या खरेदी-विक्री बाबत झाली. यातही व्यापाऱ्यांनी त्यांचा फायदा करून घेतली. एकूणच कोरोना काळात शेतकरी उपाशी तर व्यापारी तुपाशी अशी परिस्थिती राहिली आहे. त्यामुळे आता आठवडी बाजार सुरू करण्यात यावे यामागणी साठी शेतकरी आग्रही आहे.
आंदोलनात पदाधिकारी, शेतकरी उपस्थित -
यावेळी स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष मंगेश आजबे, तालुका युवक अध्यक्ष राहुल पवार, सरपंच कृष्णा राजे चव्हाण, ऋषिकेश डुचे, भाऊसाहेब डोके, जामखेड शहराध्यक्ष, नितीन जगताप, उपशहर प्रमुख जामखेड त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते, शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.