अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एका गावी वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील सोळा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षांपासून या मुलीचे आई-वडील येथे वास्तव्यास आहेत. मोलमजुरी करून ते आपला चरितार्थ चालवितात. नेहमीप्रमाणे मुलीचे आई वडील सकाळी मोलमजुरीसाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलीचा भाऊ क्लाससाठी निघून गेला. त्यानंतर या मुलीचा घातपात झाला असावा, अशी शक्यता आहे.
मुलीचा भाऊ घरी आल्यावर उघड झाली घटना
मुलीच्या मृतदेहाजवळ एक कापडी बोळा आढळून आल्याने सांगण्यात आले. दुपारी मुलीचा भाऊ घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्याने बहिणीला हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्याने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले. मुलीस खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
अत्याचार करून खून?
मुलीच्या मृतदेहाजवळ एक चाकू तसेच टॉवेलच्या तुकड्याचा बोळा आढळून आल्याची माहिती पुढे आली असून चाकुचा धाक दाखवून तोंडात बोळा कोंबून मुलीवर अत्याचार करण्यात आला त्यातच तिचा मृत्यू झाला असावा, असेही सांगण्यात आले. मात्र त्यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुलीवर अत्याचार झाला, की करण्याचा प्रयत्न झाला हे आता पीएम रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल. या प्रकारामुळे गावात संतापाचे वातावरण असून आज सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रात्रीच तातडीने मुलीचा मृतदेह नगरच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे. यासंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले असून अजून एकाचा शोध घेतला जात आहे.