अहमदनगर - शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे-पाटील विरुध्द काँग्रेसचे सुरेश थोरात अशी लढत होत आहे. मात्र, खरी लढत राधाकृष्ण आणि बाळासाहेब थोरात या दोन राजकीय विरोधकांमध्येच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बाळासाहेब थोरात विखे विरोधात कोण उमेदवार देतात याची उत्सुकता सर्वांना होती. त्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून थोरातांनी आपले चुलत बंधू सुरेश थोरात यांनी उमेदवारी दिली.
हेही वाचा - नागपूरचं बोचकं परत नागपूरला पाठवा, अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
गेली 5 टर्म आमदारकी करत असलेल्या विखे घराण्याची केंद्रात, राज्यात आणि जिल्हयातील राजकारणात वर्चस्व राहिले आहे. सातत्याने काँग्रेसच्या पंजावर निवडणूक लढविलेल्या राधाकृष्ण विखेंनी एकदा शिवसेनेच्या तिकिटावर पोट निवडणूक लढवत विजय मिळवला होता. तर आता या निवडणुकीतही विखेंनी काँग्रेसची 'हात' सोडत भाजपचे 'कमळ' हातात घेतले आहे. विखे यंदा कमळाच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा - 'स्वतःच ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून'
शिर्डी मतदारसंघातील प्रवरा सहकारी साखर कारखाना आणि बंद पडलेला गणेश कारखाना विखेंनी चालवायला घेतला. त्याचबरोबर अनेक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परीषदेवर विखेंचे वर्चस्व राहिले आहे. आता विखेंनी भाजपत प्रवेश केल्यामुळे विखे समर्थकांबरोबरच भाजप-सेनेच्या सर्वांना आणि विखे विरोधकांना बरोबर घेत आपल्या मतदारसंघातील पकड मजबुत केली आहे.
तर आगामी सरकार हे युतीच येणार असल्याने मतदारसंघाचा अधिक विकास साधण्या बरोबर निळवंडे कालव्याचे पाणी जिरायत भागात आणने, गोदावरी कालव्याचे रुंदीकरण, सिंचनासाठी अतिरिक्त पाणी, हे मुद्दे घेवून विखे या निवडणुकीत मतदारांसमोर आपली बाजू मांडत आहेत.