अहमदनगर- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकरी शिवाजी आमले यांनी आत्महत्या केली होती .या कुटूबांला जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून विखे पाटील परिवाराने दतक घेतले आहे.गुढी पाडव्याच्या सणाचे औचित्य साधून डाॅ.सुजय विखे पाटील यांनी या परिवाराची भेट घेवून पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तत्पुर्वी त्यांनी गुढीची पूजा केली.
शरद पवारांवर साधला निशाणा-
ज्यांना देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे असे नेते आज माझ्या विरोधात येवून प्रचार करीत आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची असली तरी माझ्यासाठी या भागातील शेतक-यांचे आणि पाण्याचे प्रश्न महत्वाचे आहेत. या मतदार संघाचे प्रश्न मागील 3 वर्षे मी समजुन घेतले आहे. या प्रश्नांना न्याय मिळवुन देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा लोकसभेच्या सहभागृहात विचार करुन प्रश्न मांडण्यासाठीच तुमचे प्रतिनिधीत्व करण्यात मला समाधान वाटेल, असे प्रतिपादन डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ.विखे पाटील यांनी आज पारनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेठी घेवून निवडणुकीतील आपली भुमिका मांडली. मतदारांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षाही जाणुन घेतल्या. एका गावात तर त्यांनी वडाच्या पारावरच ग्रामस्थांशी संवाद साधुन सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. माझी ही निवडणुक या भागातील पाणी, शेतक-यांचे प्रश्न, युवकांसाठी रोजगाराची संधी निर्माण करुन देण्यासाठी असल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले. या भागात आपण ३ वर्षांपासुन सातत्याने फिरत आहोत त्यामुळे प्रश्नांचा अभ्यास आता माझा झाला आहे, समोरच्या उमेदवाराला कालच पारनेर तालुका आठवला. यापुर्वी त्यांना हा तालुका कधीही दिसला नाही. एका दिवसात चार सभा घेवून ते तालुक्याच्या पाणी प्रश्नांवर बोलू लागले याचे आश्चर्य व्यक्त करुन त्यांनी सांगितले की, शेतक-यांचे प्रश्न मांडण्यासाठी वैचारिकता पाठीशी लागते. असा टोमणा त्यांनी आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांना लगावला.
निवडणुकीत आरोप प्रत्योराप आणि हेवेदावे करण्यात मला रस नाही-
मी आतला की बाहेरचा यावर टिकाटिपणी करण्यापेक्षा मला या भागातील पाण्याचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यायचा आहे. प्रत्येक गावात प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही असलीच पाहीजे. हा भाग टँकरमुक्त कसा होईल हेच आपले ध्येय आहे. त्यादृष्टीनेच लोकसभेच्या सर्वोच्च सभागृहात तुमचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मी निवडणुकीत उभा असल्याची भुमिका त्यांनी पारनेर तालुका दौऱ्यात मतदारांपुढे मांडली.