अहमदनगर - लोकसभा निवडणुकात मिळालेल्या यशानंतर नगर जिल्ह्यात 12 विरुद्ध 0 चा नारा कार्यकर्ते आणि उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी होता, अशी सारवासारव खासदार सुजय विखे यांनी केली. जनतेने दिलेला जनादेश आम्ही स्वीकारत आहोत. मात्र, त्याच बरोबर पक्षाला मिळालेल्या अपयशाची कारणमीमांसा आम्ही तालुका पातळीवर करणार असून मी स्वतः खासदार या नात्याने पक्षाला त्याचे उत्तर देईल, असेही विखेंनी स्पष्ट केले.
मंत्री राम शिंदे यांच्यासह 3 विद्यमान आमदारांसह 6 उमेदवारांच्या झालेल्या पराभवाचे खापर आमच्यावर अद्याप कोणी फोडल्याची तक्रार आमच्या पर्यंत नाही. आम्ही पाडापाडीचे राजकारण केले, अशी कोणी अधिकृतपणे तक्रार केलीच तर त्याचे उत्तर जरूर देऊ. मात्र, आमदार राजळे, आमदार पाचपुते यांनी स्वतः राधाकृष्ण विखे यांना भेटून आभार मानले आहेत, असा निर्वाळा देत विखेंनी पराभूत भाजप उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याच्या चर्चेचे खंडन केले.
पवारांच्या भाषणांचा धडाका राष्ट्रवादीच्या कामी -
राज्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याचे आणि राष्ट्रवादीने चांगली मुसंडी मारल्याच्या प्रश्नावर बोलताना विखेंनी भाजपचा स्ट्राईक रेट निश्चित चांगला असल्याचे निदर्शनास आणले. मात्र, यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे त्यांनी मनमोकळेपणाने कौतुकही केले. पवार साहेबांनी राज्यभर केलेल्या सभांचा तडाखा मान्य करावा लागेल, त्यामुळेच राष्ट्रवादीला चांगले यश मिळाल्याचे त्यांनी कबूल केले.