अहमदनगर- लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध साखर कारखान्यात अडकलेले अनेक ऊसतोड मजूर सरकारी मदतीची वाट न पाहाता आता आपल्या गावांकडे परतत असल्याचे चित्र आहे. अर्थात यात बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर कुटुंबांचा समावेश मोठा असून नगर जिल्ह्यातून ही मंडळी बीड जिल्ह्याकडे आगेकूच करत आहे. वाटेत यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. खाण्यापिण्याची आबाळ, बैलांचा चारा, जनावरांची टाचेला पट्या मारण्याची असुविधा, पोलिसांचा आणि स्थानिकांचा रोष अशा परिस्थितीत आहे त्या ठिकाणी त्रास सहन करण्यापेक्षा वाटेत अडचणींना तोंड देऊ पण आपल्या स्वतःच्या गावात आणि हक्काच्या घरात जाऊ या जिद्दीने ही कुटुंबे मजलदरमजल करत बीड जिल्ह्याकडे निघालेली आहेत.
शासनाने ऊसतोड मजुरांसाठी विशेष आदेश काढून त्यांना घरी परतण्याची रितसर व्यवस्था केलेली असली तरी अनेक कुटुंबे ही असा आदेश निघण्यापूर्वीच गावाकडे निघालेली आहेत. ही ऊसतोड कुटुंब बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यांवर ही कुटुंबे होती. मात्र पट्टा पडल्यानंतर अर्थात ऊसाचे गळीत थांबल्या नंतर कारखान्यांने यांच्या खाण्यापिण्याच्या सुविधा बंद केल्याचा यांचा आरोप आहे.
कुटुंबाचे आणि जनावरांचे एकीकडे हाल होत असताना आणि लॉकडाऊन पुन्हा वाढला असताना वैतागून या कुटुंबांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला..वाटेत अडचणी येत असल्या तरी अनेकजण मदत करत असल्याचा अनुभवही त्यांना आला. नगर मधून पाथर्डी रोडने पुढे जात असताना नगर मधले सामाजिक कार्यकर्ते घर-घर लंगर अभियान राबवणारे हरजित वधवा यांनी या कुटुंबांच्या जेवणाची आणि जनावरांच्या चाऱ्या बरोबरच त्यांच्या तळपायाला पट्या मारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सध्या विविध पातळीवर कोरोना युद्ध लढत आहे. यात नागरिकांनी घरीच थांबण्या बरोबर स्थलांतरित कामगारांनी सुद्धा आहे. त्याच ठिकाणी थांबण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र लॉकडाऊन वाढवल्यानंतर स्थलांतरित कामगारांचा धीर सुटत चालल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले आहे, त्यात राज्यातून दबाव वाढल्याने ऊसतोड कामगारांना परतण्यासाठी सरकार व्यवस्था करत असले तरी अनेक ऊसतोड कुटुंबे सरकारच्या मदतीची वाट न पाहता अडचणींना तोंड देत आपल्या गावाकडे आगेकूच करत आहेत.