अहमदनगर: अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथील तुकाराम भावका धुमाळ यांनी धुमाळवाडी गावाजवळ असलेल्या आपल्या शेतामध्ये रीजनरेटिव्ह एग्रीकल्चरचा प्रयोग (regenerative agriculture) यशस्वी करून दाखवला आहे. (successful experiment of regenerative agriculture). त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडवत हा प्रयोग साध्य केला आहे. त्यांनी सहकार क्षेत्रात ऊस कारखान्यावर संगमनेर व अकोले येथे मिळून ४१ वर्ष सेवा दिली. सेवापूर्ती नंतर त्यांनी स्वतःला शेतीमध्ये झोकुन दिले आहे. (regenerative agriculture in akole)
खादी ग्राम उद्योग केंद्राकडून प्रशिक्षण: अकोले तालुक्यातील सेंद्रिय शेतीचे तज्ञ तथा ज्येष्ठ मार्गदर्शक संपतराव वाकचौरे यांच्या संपर्कात आल्यानंतर सेंद्रिय व शाश्वत शेतीचे मार्गदर्शन त्यांना लाभले. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक कार्यशाळा व अभ्यास दौऱ्यांमध्ये तसेच प्रशिक्षणांमध्ये सहभाग नोंदवला. त्यांना सेंद्रिय शेतीची आवड निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी वडिलोपार्जित असलेली अडीच एकर शेती विकसित करण्याचा निर्णय घेतला. खादी ग्राम उद्योग केंद्राकडून त्यांना मधमाशी पालन करण्याचे प्रशिक्षण मिळाले होते. या प्रशिक्षणातच त्यांना मधमाशांमुळे शेतातील पिकांचे उत्पादन वाढते व पर परागीभवनासाठी त्यांची मदत होते याची माहिती मिळाली होती.
विविध फळे व फुलपिकांची लागवड: त्यानुसार त्यांनी आपल्या शेतावर सोळा मधमाशांच्या पेट्या बसवल्या आहेत. मधमाशांना मध जागेवरच उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी आपल्या शेतावर निशिगंध या फुल पिकाची लागवड सुमारे तीस गुंठे क्षेत्रावर केलेली आहे. त्याचबरोबर मध्यभागी असलेल्या जागेत आंतरपीक म्हणून पपई, लिंबू, शेवगा, आंबा, सीताफळ या फळ पिकाची लागवड केलेली आहे. घरी खाण्यासाठी व विक्रीसाठी भाजीपाला पिके लागवड करण्यात आलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने कारली, घोसाळी, दोडकी, काकडी, लाल भोपळा, दूधी भोपळा, वांगी, टोमॅटो, मिरची, गवार, भेंडी यासारख्या भाज्यांची त्यांनी नियोजनपूर्वक लागवड केलेली आहे. मधमाशांना पिवळ्या रंगाची फुले आकर्षित करतात व त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध् उपलब्ध होत असल्याने त्यांनी अशा प्रकारची पिके लावण्यावरती भर दिलेला आहे. फुलपिकांमध्ये शेवंती, झेंडू, बिजली यासारख्या पिकांची त्यांनी यशस्वी लागवड करून दाखवली आहे. शेतावर अझोला या पशुखाद्याची बेडमध्ये लागवड केलेली आहे.
मध विक्रीतून दीड लाख रुपये उलाढाल: त्यासाठी त्यांना बायफ संस्थेची मदत लाभली आहे. शेताला मुबलक प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे यासाठी गांडूळ खताची निर्मिती व गांडूळ पाणी निर्मिती स्वतःच्या शेतावर सुरू केली आहे. अतिशय काटेकोर नियोजन करून त्यांनी शेतामध्ये आमुलाग्र बदल घडून आणला आहे. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा करत आहे. मध विक्रीतून त्यांची वार्षिक दीड लाख रुपये उलाढाल होते. हा अनुभव घेऊन त्यांनी खादी ग्राम उद्योग केंद्राकडून मधमाशी पालन उपक्रमासाठी अजून पन्नास पेट्यांचे नियोजन केले आहे. त्यासाठी त्यांना वैयक्तिक एक लाख अडोतीस हजार रुपये गुंतवणूक केली आहे.
आदर्श शेतकरी म्हणून ओळख: खादी ग्राम उद्योगाकडून त्यांना एक लाख अडोतीस हजार रुपये अनुदान स्वरूपात मदत मिळणार आहे. महाबळेश्वर येथे खादी ग्रामोद्योग विभागाकडून वीस दिवसाचे निवासी प्रशिक्षण त्यांना मिळणार आहे. स्वतः मधमाशांची काळजी घेत त्यांच्या माध्यमाने शेतातील पिकांचे नियोजन करणारे ते एक आदर्श शेतकरी ठरले आहेत. सध्या त्यांना मध विक्रीतून महिन्याला पंधरा ते सोळा हजार रुपये उत्पन्न मिळते. 16 पेट्यांमधून सरासरी 20 ते 25 किलो मध ते गोळा करतात व सहाशे रुपये किलो या दराने स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री केली जाते. गुलछडीची फुले विकून प्रत्येक महिन्याला 25 ते 30 हजार रुपये उत्पन्न मिळते. पपई विक्रीतून पंधरा ते सोळा हजार रुपये प्रति महिना त्यांना मिळतो. मधमाशी पालनामुळे त्यांच्या शेतातील उत्पन्न कमालीचे वाढले आहे, असा त्यांचा अनुभव आहे.
विविध विभागातील तज्ज्ञांच्या शेताला भेटी: त्यांना तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन कृषी विभाग, बायफ संस्था, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषी विद्यापीठ राहुरी, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी तसेच अकोले तालुका कृषी विकास प्रतिष्ठान यांचे कडून मिळाले आहे. या विविध विभागातील तज्ज्ञांनी त्यांच्या शेताला भेटी दिल्या आहेत. या सर्वांच्या मार्गदर्शनाने त्यांची शेती अधिकाधिक उत्तम होत आहे.