शिर्डी - आज शुक्रवारी जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. जागतिक योग दिना निमित्त शहरातील विद्यालयात बैठक व्यवस्थेच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंगचा संदेश देण्यात आला आहे. तब्बल 1450 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेत ही अनोखी संकल्पना राबविली आहे.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावातील डी. के. मोरे जनता विद्यालयाकडून नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने वर्षातील विशेष दिन साजरे केले जातात. आज जागतिक योग दिवस वेगळ्या पध्दतीने साजरा केला आहे. शरीरासाठी जसा योग महत्वाचा आहे. तसेच पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी साठवणे हे देखील महत्वाचे आहे.
याच प्रेरणेतून आज जागतिक योग दिनानिमित्त योगाची प्रात्यक्षिक करताना अनोखी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रेन हार्वेस्टिंग चा संदेश देत 1450 मुलांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे नेमके काय करायचे?
पावसाळ्यात घराच्या छतावर साठणारे पावसाचे पाणी छताच्या उताराच्या बाजूने पाईप लावून खाली घ्यायचे. पाईपद्वारेच हे पाणी विहिरीजवळच्या शोषखड्ड्यात किंवा ते वाहून न जाता जमिनीत मुरेल अशा प्रकारे सोडायचे. पावसाळ्यात पाणी मुरवायचे आणि उन्हाळ्यात हवे तसे, हवे तेवढे वापरायचे असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज आहे, असा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला.