अहमदनगर - गेल्या वीस वर्षांपासून नगर शहरवासीयांचे स्वप्न राहिलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला. अनेक परवानग्या न घेताच उड्डाणपुलाच्या कामाचा यापूर्वी अनेकदा शुभारंभ झाला होता. मात्र, केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळत नसल्याने प्रत्यक्षात काम सुरू होत नसे. मात्र, आता खासदार सुजय विखे यांनी जातीने लक्ष घालून संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करत परवानगी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने आता उड्डाणपुल निर्माणातील सर्व अडथळे मिटले आहेत.
शहरातील सक्कर चौक ते जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय चौक, असा तीन किलोमीटरचा हा उड्डाणपूल असणार आहे. या कामासाठी 258 कोटी 30 लाख रुपये खर्च येणार आहे. या चार पदरी उड्डाणपुलाची बांधणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण करणार आहे. सध्या पूल बांधणीच्या रस्त्यावर दीडशे ठिकाणी माती आणि खडक याची तांत्रिक तपासणी सुरू होत असून याद्वारे पुलाच्या उभ्या पिलरची खोली ठरवण्यात येत आहे.
शुभारंभ कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह महामार्ग प्रकल्प प्राधिकरणाचे संचालक प्रफुल्ल दिवाण, जिल्हापोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह आदी उपस्थित होते.
उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर शहरातील वाहतुकीवरील मोठा ताण कमी होणार आहे. पुणे, औरंगाबादसह विदर्भ मराठवाडा, सोलापूर, शिर्डी आदी ठिकाणी जाण्यासाठी शहरातूनच वाहतूक मार्गस्थ होते. तसेच दक्षिण-उत्तर भारताला जोडणारा मार्गही हाच असल्याने शहरातील वर्दळीच्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असते. मात्र, उड्डाणपुलाच्या निर्माणामुळे वाहतुकीची कोंडी टळणार आहे.