अहमदनगर - श्रीरामपूर शहरातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असून, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे शोधण्यासाठी चक्क स्पायडरमॅन रस्त्यावर पाहावयास मिळाले. शहरातील खड्डेमय रस्त्यांसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने स्पायडरमॅन आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या श्रीरामपूर शहरातील नेवासा-संगमनेर रोड, गोधवणी रोड, शहरातील मेनरोड, शिवाजी रोड, तसेच बेलापूर रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, गेल्या ३ वर्षांपासून नागरिकांसह बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात अनेक वेळा आंदोलने होऊन देखील नगरपालिकेतील राजकीय जिरवा जिरवीत शहरवासीयांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारावी या मागणीसाठी आम आदमी पक्ष अहमदनगरच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहरातील रस्त्यांच्या खड्यांवर 3 स्पायडरमॅन कसरत करताना पाहायला मिळाले. हे आंदोलन आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, कामागारनेते नागेशभाई सावंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे हैराण नागरिक, व्यापारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.