शिर्डी (अहमदनगर) - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण झालेल्या ठिकाणास विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी भेट देवून घटनाक्रम जाणून घेतला आहे. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल कटके यावेळी उपस्थित होते.
तपासाबाबतच्या सूचना
दिघावकर यांनी हिरण यांचे अपहरण झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. या घटनेत असणाऱ्या साक्षीदारांशी सविस्तर चर्चा केली. ज्या ठिकाणाहून अपहरण झाले त्या ठिकाणाचीही पाहणी केली. त्यानंतर मनोज पाटील यांना तपासाबाबत सूचना केल्या.
विरोधी पक्षाची टीका
हिरण यांच्या अपहरणाचा आणि हत्येचा तपास लागत नसल्याने त्यांचे नातेवाईक, बेलापूर ग्रामस्थ तसेच व्यापारी वर्गात मोठा रोष पाहायला मिळत आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. मात्र विभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी लवकरच प्रकरणाचा तपास लावू, असे आश्वासन दिल्यानंतर मृत हिरण यांच्यावर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करत गृहविभागावर निशाणा साधला होता. भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही गृहविभागाच्या कामावर टीका करत घटनेचा उलगडा करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
कारण अस्पष्ट
हत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. ही हत्या व्यावसायिक वादातून झाली, की अन्य कारणामुळे याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण हे समोर आणावे, अशी मागणी नातेवाईक आणि व्यापारी करीत आहेत.
एकूण 40 जणांची चौकशी
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हिरण यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना श्रीरामपूर परिसरातून ताब्यात घेतले आहे. सागर गंगावणे व बिट्टू ऊर्फ रावजी वायकर अशी त्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत एकूण 40 जणांची चौकशी केली. तपासात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. लवकरच सर्व आरोपी अटक होतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.