अहमदनगर - शहराला लागून वाहणाऱ्या सीना नदी पात्रात लहान बाळाला एका पोत्यात बांधून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती एका महिलेने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी आणि अहमदनगर मनपाच्या आपत्कालीन यंत्रणेने तातडीने सीना नदी पात्रात शोध कार्य सुरू केले.
जेव्हा अज्ञातांनी पुलावरुन हे पोते नदीपात्रात फेकले त्यावेळी पोत्यातून रडण्याचा आणि पोत्यात हालचाल होत असल्याचे महिलेचे म्हणणे आहे. तर नेमके पोत्यात काय होते याबाबत ठोस उलगडा झाला नाही. तरी महिलेने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी घटनास्थळावरील नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. या ठिकाणी तोफखाना आणि कोतवाली अशा दोन पोलीस ठाण्याची हद्द येते, त्यामुळे या दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच मनपाच्या आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी, अग्निशमन दल यांनी शोधकार्य सुरू केले.
हेही वाचा - दिलासादायक! कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रुग्णांची संख्या अधिक...
सीना नदीचे पात्र अतिक्रमणामुळे अरुंद झालेले आहे. त्याला ओढ्याचे स्वरुप आलेले आहे. या नदीपात्रात अनेक कारखान्यांचे सांडपाणी, शहरातील मैला पाईपलाईनमधून सोडण्यात येतो. त्यामुळे याठिकाणी गाळ आणि दुर्गंधीचे साम्राज्य आहे. दोन दिवसात परिसरात पाऊस झाला असल्याने सध्या नदीपात्रात पाणी वाहत आहे. त्यामुळे या परिस्थितीत संशयित घटनेचा तपास करताना अनेक अडचणी येत आहे, तरीही शोधकार्य सुरू होते.
तर नेमके पोत्यात लहान जीवंत बाळ होते की इतर काही याबाबत पोलिसांना संशय आहे. तरी महिलेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी गांभीर्याने शोध कार्य सुरू ठेवले आहे. मात्र, जोपर्यंत नेमका प्रकार समोर येत नाही तोपर्यंत माध्यमांशी बोलण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवली.