अहमदनगर- पाथर्डी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. यामुळे प्रवाशांना, नागरिकांना याचा त्रास होत आहे. तसेच या रस्तेकामाचा ठेकेदार सार्वजनिक ठिकाणी त्रास होईल, असे वर्तन करत आहे. त्यामुळे त्याच्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी रास्तारोको अंदोलन केले.
हेही वाचा- ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल
वसंतराव नाईक चौकात तासभर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आमदार मोनिका राजळे व खासदार सुजय विखे यांनी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्या बद्दल त्यांच्या विरुद्ध घोषणाही दिल्या. यावेळी आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, अरविंद सोनटक्के, विकास नागरगोजे, गोरक्ष ढाकणे, राजाभाऊ बोरुडे, संजय सानप, सुनिल पाखरे, लालभाई शेख, अविनाश टकले अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ, सोमनाथ बोरुडे यांच्यासह नागरिकांनीचा सहभाग होता.
एक आठवड्यात कामात सुधारणा झाली नाही तर ठेकेदार व महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले.
अनेक आंदोलने करुन पण काम सुरू होत नाही, खड्डे व धुळीमुळे नागरिकांना, वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यामुळे नवीन ठेकेदार निवडला जाईपर्यंत रस्त्यावर पाणी मारुन धुळीचा त्रास कमी करावा. आठ दिवसात काम सुरू झाले नाही तर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी किसन आव्हाड यांनी केली.