अहमदनगर - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील आता लवकरच राज ठाकरे स्टाईल, 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणण्याच्या पवित्र्यात आहेत. अण्णांनी केलेल्या कृषी मागण्या सरकारने मान्य तर केल्या मात्र, त्यांची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे अण्णांनी आता मोदी सरकारची पोलखोल करण्याचे ठरवले आहे. आता सत्तेत असणाऱ्या पक्षाने २०११ आणि २०१३च्या आंदोलनावेळी संसदेत माझ्या समर्थनार्थ केलेल्या भाषणांचे रेकॉर्ड आपण जमवत आहोत. त्याची एक सीडी जनतेच्या माहितीसाठी प्रसारित करत असल्याचे अण्णांनी स्पष्ट केले आहे. त्यावेळी हीच मंडळी संसदेत माझे तोंडभरून कौतुक करत होती. मात्र, आता माझ्या पत्राला साधे उत्तरही देत नसल्याने ही सीडी काढत असल्याचे अण्णांनी सांगितले.
सरकार माझ्याशी द्वेष भावनेने वागत आहे -
पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री यांना मी वारंवार पत्र लिहिली. पण, एकाही पत्राला अजून उत्तर दिले गेले नाही. मला दिल्लीत पुन्हा आंदोलन करायचे आहे. मात्र, जागा मिळत नाही. सरकार माझ्याप्रती द्वेषभावनेने वागत असल्याचे यावरून दिसते. मात्र, आपण आंदोलनावर ठाम आहोत, असे अण्णांनी स्पष्ट केले.
ते फक्त भेटींचे कर्तव्य बजावत आहेत -
राज्यातील अनेक नेते आपल्याला नुकतेच भेटून गेले. त्यांनी मी आंदोलन करू नये, यासाठी विनंती केली. माझ्या मागण्यांवर विचार सुरू असल्याचेही सांगितले. पण, याला काहीही अर्थ नाही. मुळात प्रश्न हा केंद्र सरकारशी निगडित आहे. निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, मात्र ते घेत नाहीत. त्यामुळे राज्यातील मनधरणी करणारे नेते फक्त आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या हातात काही नाही, अशी भावना अण्णांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे डायलॉगमुळे आले होते चर्चेत -
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांसह पक्षांनी अनोख्या पध्दतीच्या प्रचार मार्गांचा अवलंब केला होता. त्यात राज ठाकरे यांच्या 'ये लाव रे तो व्हिडिओ' या डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्याच पद्धतीने आता अण्णा हजारे केंद्र सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देणार आहेत.