अहमदनगर - पूरस्थितीनंतर आता दूरगामी विचार करुन मदतीची रुपरेषा आखली पाहिजे, असे मत समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. ते आज राळेगणसिद्धी येथे माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रावर साधुसंतांच्या संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे सांगली-कोल्हापूर पूरस्थितीनंतर सगळीकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र, आता पूरपरिस्थितीनंतर येणाऱ्या विविध संकटांचा विचार करुन दूरगामी उपाय योजनांचा विचार झाला पाहिजे, असे अण्णा म्हणाले.
पूरग्रस्तांना औषधे, मुलांची शालेय साहित्य आणि लागणारी कपडे या गोष्टींचे नियोजन करुन त्याप्रमाणे मदत पुरवली पाहिजे, असे मत अण्णांनी व्यक्त केले. एक प्रसिद्ध पत्रक काढून त्यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला या आपत्कालीन परिस्थितीत आपल्या भारतीय सहिष्णुता आणि माणुसकीच्या धर्माचा दाखला देत पूरग्रस्त जनतेसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. पूरग्रस्तांसाठी पारनेर आणि राळेगणसिद्धी परिवाराच्यावतीने बुधवारी विविध उपयोगी साहित्याची मदत पाठवली आहे.