शिर्डी (अहमदनगर)- साईबाबा संस्थानचे अध्यक्ष, जिल्हा न्यायाधीश यांनी साई मंदिरातील पाहणी केली. त्याच पाहणी दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. या कटात सहभाागी असलेल्या संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांसह इतर दोघांना पोलिसांनी अटक करुन गुरुवारी राहाता येथील न्यायालयात हजर केले.यावेळी दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सहाही जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
साईबाबा संस्थानाचे शिर्डीचे प्रशासकीय विभाग प्रमुख राजेंद्र जगताप, CCTV विभाग प्रमुख विनोद कोते, कर्मचारी सोसायटीचे कर्मचारी अजित जगताप, कर्मचारी सचिन गव्हाणे, राहुल फुंदे यांनी कर्मचारी चेतक साबळे अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत.
गेल्या 31 जुलै रोजी साईसंस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर जिल्हा प्रधान न्यायाधीश व तदर्थ समितीच्या सदस्या असलेल्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराची पहाणी केली होती़. एका युट्युब चॅनलने मात्र अध्यक्ष व समितीच्या सदस्यांनी कोविड नियमांचा भंग केल्याची व मंदिर बंद असतानाही दर्शन कसे घेतले, अशी बातमी प्रसिद्ध केली. या बातमीमध्ये मंदिरातील फोटो व सीसीटिव्ही फुटेजही वापरण्यात आले होते़. यामुळे भाविकांनामध्ये गैरसमज पसरला व बदनामी झाल्याचा ठपका ठेवत संस्थेच्या अध्यक्षांनी संस्थानच्या सुरक्षा प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले होते़.
सुरक्षा प्रमुखांनी केली तक्रार दाखल-
या प्रकरणात संबधितांनी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याच्या हेतूने हे कृत्य केले असून यामुळे मंदिर सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला. हे सर्व करत असताना हार्डडिक्समधील फोटो डिलीट करण्यात आले व संगणकातील फोटे घेवून त्यात छेडछाड केल्याच्या गंभीर मुद्द्यावर साई मंदिर सुरक्षा प्रमुख हर्षवर्धन गवळी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभाग प्रमुख विनोद कोते, पत्रकार राहुल फुंदे, संस्थान कर्मचारी पतपेढीचे कर्मचारी अजित जगताप, सचिन गव्हाणे व कर्मचारी चेतक साबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले.
हे तर प्यादे..वजिराला अटक करा -
साई संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश आणि सदस्या यांचे मंदिरातील फोटो बदनामी करण्यासाठी व्हायरल केले. या प्रकरणी सहा जणांवर कारवाई करण्यात आली. मात्र हे केवळ प्यादे आहेत, त्यांचा वजीर साई संस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे हे आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करत त्यांना अटक करा, अशी मागणी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. बगाटेंनी व्हाटस अॅप द्वारे केलेल्या चाट मधुन या प्रकरणात बगाटेंचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप करत संजय काळे यांनी बगाटेवर त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - विश्वस्त नेमणुकीत नियमांचे उल्लंघन; साई मंदिर समितीच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार सामाजिक कार्यकर्ते
हेही वाचा - साई संस्थानच्या सदस्यांची बदनामी केल्याप्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक