शिर्डी - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरचे रहिवासी राजेश खटोड आणि हनुमंत खटोड यांच्या घराच्या परिसरात खोदकाम करत असताना मजुरांना गुप्तधन सापडले होते. खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनापोटी खटोड यांनी त्या मजुरास अकरा लाख रुपये देण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, ते पैसे देण्यास नकार दिल्याने आणि मानिसक छळ केल्याने त्याने आत्महत्या केली आहे, असा आरोप मृत मजुराच्या पत्नीने केला आहे. सुनिल गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी गायकवाड याच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरुन श्रीरामपूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बेलापुरातील दोन खटोड बंधुवर गुन्हा दाखल केला आहे.
बेलापूर येथे वट पौर्णिमेच्या दिवशी सुनिल गायकवाड हे दोन मजुरांना सोबत घेऊन राजेश आणि हनुमंत खटोड यांच्या घराचे मागील बाजुच्या मोकळ्या जागेत झाडे लावण्यासाठी मजुरीने खड्डे खोदण्याच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी सुनिल गायकवाड यांना खोदकामात एक तांब्याचा हंडा सापडला. त्यामध्ये वर चांदी व खाली सोन्याची नाणी होती. तो हंडा पुर्णपणे भरलेला होता. खड्डा खोदताना हंड्याला धक्का लागला त्यामुळे त्यातील नाणी खाली पडली. त्यावेळी सुनिल यांनी ती नाणी फावड्याच्या सहाय्याने पुन्हा हंड्यात टाकली आणि राजेश व हनुमंत खटोड यांना याची माहिती दिली.
खटोड बंधुनी तो हंडा ताब्यात घेत याची वाच्यता न करण्यासाठी मजूर गायकवाड याला अकरा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी 1 लाख 28 हजार रुपये रोख त्यांनी सुनिलला दिले. मात्र त्यानंतर सुनीलने राहिलेले दहा लाख रुपये मागण्यासाठी वेळोवेळी राजेश व हनुमंत खटोड यांचेकडे हेलपाटे मारले. मात्र खटोड बंधूनी त्याल पैसे न देता शिवीगाळ करत मारहाण केली. तसचे आमच्याकडे भरपूर पैसे आहेत तुला कोठेही कामधंदा करु देणार नाही. तुला काम मिळू देणार नाही. तुझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणून भिक मागायला लावू, असे म्हणून गायकवाडला धमकावले.
तहसीलदारांनी जप्त केले गुप्तधन-
हा घडलेला सर्व प्रकार सुनीलने आपल्या पत्नीला सांगितला. तेव्हापासून सुनील घरी कुणा सोबतही बोलत नसत. त्या लोकांना घाबरुन ते घरातच बसुन रहात होते. याच दरम्यान त्या गुप्त धनाची बातमी गावभर पसरली आणि तहसीलदार यांनी त्या गुप्तधनाचा पंचनामा करुन ते जप्त केले. त्यानंतर जेव्हा जेव्हा राजेश खटोड व सुनील गायकवाज यांना भेटत असे त्यावेळी ते त्याला म्हणत असत की, तुझ्यामुळे आम्हाला आमचे वडीलोपार्जित धन शासनाला जमा करावे लागले. तुच ही बातमी सर्वांना सांगितली, तुला आता तुझी अवकात दाखवतो, अशाप्रकारचे धमकावणे सुरू झाले, खटोड बंधूकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून सुनील यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूला खटोड बंधूच जबाबदार आहेत, अशी तक्रार सुनील यांच्या पत्नी वंदना गायकवाड यांनी दिली आहे.
वंदना गायकवाड तिच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात राजेश आणि हनुमंत खटोड यां दोघावर भादवि कलम ३०६ ,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यत आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हे करत आहे.
हेही वाचा - नागपूर; घरात गुप्तधन असल्याचे सांगत महिलेची एक लाखांची फसवणूक
हेही वाचा - चंद्रपुरात अंधश्रद्धेचा कळस; गुप्तधन मिळवण्यासाठी सुशिक्षीत कुटुंबीयांकडून नववधूचा छळ