अहमदनगर - श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड मंगळवारी होणार आहे. या निवडीसाठी काँग्रेसच्या दोन महिला उमेदवार आमने-सामने आहेत. त्यामुळे सभापती निवडीबाबत कमालीची उत्सुकता आहे.
काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या वंदना मुरकुटे आणि संगीता शिंदे या दोघींनीही ‘व्हिप’बजावल्याने संभ्रम निर्माण झाला. या दोघींनीही थेट वर्तमानपत्रातून व्हिप जाहिर केला. त्यामुळे मंगळवारी दुपारी मतदान झाल्यानंतरच सभापतीपद कोणाकडे जाते हे स्पष्ट होईल.
हेही वाचा - जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांना जीवनगौरव पुरस्कार
श्रीरामपूर पंचायत समितीत काँग्रेसचे चार सदस्य निवडून आले आहेत तर चार सदस्य हे विकास आघाडीचे आहेत. यामध्येही विखे-मुरकुटे समर्थक आणि ससाणे समर्थक अशी विभागणी होते. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या संगीता शिंदे विखे-मुरकुटे गटाकडे गेल्याने या गटाकडे पाच आणि ससाणे गटाकडे तीन सदस्य बाकी आहेत. मात्र, ससाणे गटाने राजकीय डावपेच खेळत संगीता शिंदे यांचे काँग्रेसचे गटनेतेपद रद्द करून डॉ. वंदना मुरकुटे यांची गटनेतेपदी निवड केली. त्यामुळे तालुक्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांच्या नजरा आहेत.
श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडीसाठी मंगळवारी दुपारी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक होणार आहे. श्रीरामपूर पंचायत समिती सभापतीपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित आहे. या प्रवर्गातील संगीता शिंदे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आहेत. त्यामुळे वंदना मुरकुटे यांना आता संधी मिळण्याची शक्यता आहे.