शिर्डी : अतिमहत्वाच्या व्यक्तींना कमी वेळेत साईदर्शन मिळावे यासाठी माजी मंत्री, आमदार, खासदार, विश्वस्त यांना खासगी स्वीय सहाय्यक नेमण्याची मुभा होती. मात्र याचा गैरफायदा घेत काही खासगी स्वीय सहाय्यकांनी (पीए) त्यांच्या पीएची नियुक्ती केल्याचे साई संस्थानच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे साई संस्थानच्या तदर्थ समीतीने बोगस पी यांना प्रतिबंधीत करत व्हीआयपी व्यक्तींसाठी नियमावली तयार केल्याचे साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगीतले आहे.
मुभा देण्याचा गैरफायदा : साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त शिर्डीत येत असतात. उत्सव आणि सलग सुट्टी दरम्यान भाविकांचा आकडा लाखोंवर असतो. मंदिरात जाण्यासाठी दर्शनरांगेत किमान तीन चे चार तास लागतात. अशा वेळी मंत्री, खासदार, आमदार यासह अनेक व्हीआयपी देखील साई दर्शनाला येतात. साई संस्थानच्या नियमावली नुसार महत्वाच्या आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींना कमी वेळेत दर्शन मिळावे यासाठी आमदार, खासदार महत्त्वाचे व्यक्ती यांना खासगी पीए नेमण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र याचा गैरफायदा घेत पीए असल्याचे भासवून वैयक्तिक संबंधातील व्यक्तींना व्हीआयपी दर्शन घडवून देण्यासाठी साई मंदिर परिसरात दररोज अनेकांची लगबग सुरू असते. संस्थानच्या जनसंपर्क कार्यालया जवळ नेहमी अशा व्यक्तींची वर्दळ असते. त्यामुळे साई संस्थानने कडक पाऊल उचलत अशा व्यक्तींना पायबंद घातला आहे.
समितीने कठोर पाऊले उचली : काही तथाकथित पी.ए. भाविकाकंडून मोठी माया घेत असल्याच्या तक्रारी संस्थानला प्राप्त झाल्या आहेत. अशा तक्रारी प्राप्त होताच साईसंस्थानचा कारभार पाहणाऱ्या तदर्थ समितीने कठोर पाऊले उचलली आहेत. ज्यानुसार यापुढे आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, विश्वस्त यांना स्विय सहाय्यकाचे अधिकृत पत्र साईबाबा संस्थानला द्यावे लागणार आहे. तसेच व्हीआयपी व्यक्तींना किमान एक दिवस आधी शिर्डीला येण्याबाबतची सुचना संस्थानला द्यावी लागणार असल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव यांनी स्पष्ट केले आहे. साई संस्थान सेवेतील काही कर्मचारी आणि अधिकारी देखिल अशा प्रकारच्या गैर प्रकारात सहभागी असल्याच्या तक्रारी तदर्थ समितीला प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारात कर्मचारी अधिकारी सहभागी असल्याच निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार असून तसे परिपत्रकदेखील संस्थानच्या वतीने काढण्यात आल्याची माहिती राहुल जाधव यांनी दिली आहे.