अहमदनगर - भारतीय जनता पक्षाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत याच्यासह सुमारे ४१७ जणांना आज शनिवारी (ता. २३) एक दिवसाची शहरबंदी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रातांधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावावर हा आदेश देण्यात आला आहे.
शहरात शनिवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या जयंतीची तयारी सुरू केली आहे. या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. तोफखाना पोलिसांनी ७० जणांवर शहरबंदीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर आदेश देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर श्रीपाद व त्यांचे बंधु श्रीकांत छिंदम याच्यासह ७० जणांविरोधात तोफखाना पोलिसांचा प्रस्ताव होता. श्रीपाद छिंदम याची पार्श्वभूमी सर्वश्रूत आहे. उपमहापौर असताना त्याने महापालिका कर्मचाऱ्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधताना शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्याच्यावर शहरबंदी घालण्यात आली आहे.
कोतवाली पोलिसांनी सुमारे २०० जणांचे प्रस्ताव कारवाईसाठी दिले होते. त्यावर आदेश झाल्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी माहिती दिली. भिंगार कॅम्प पोलिसांनी सुमारे १४७ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करत शहरबंदीचा ठेवला होता. त्यावर आदेश झाल्यानंतर आज संबंधितांनी शहरबंदीच्या नोटीसा बजाविण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंह रजपूत यांनी सांगितले.