अहमदनगर - देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क कार्यलयातील एका अधिकाऱ्याने काही साईभक्त महिलांना अश्लील फोटो पाठवल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना महिला आघाडीच्या राहाता तालुका प्रमुख स्वाती परदेशी यांनी केला आहे. याबाबत साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करा, अशा आशयाचे निवेदन शिर्डीतील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश, तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा अहमदनगर धर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती स्वाती परदेशी यांनी दिली.
चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी, साई संस्थान
साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क कार्यलयातील एका अधिकाऱ्या विरोधात साईभक्त महिलेने तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जाची पूर्णपणे शहानिशा करून या सर्व प्रकारणाची सखोल चौकशी करून संबंधित विभागातील अधिकाऱ्यावर कारवाई करणार, असे साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले.
हेही वाचा - अभिनेत्री नयनताराने विघ्नेशसोबत घेतले साई समाधीचे दर्शन