अहमदनगर - भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी सैन्याच्या हल्ल्यात भारताच्या वीस जवानांना वीरमरण आले आहे. चीनच्या या कृतीचा निषेध म्हणून नगर शिवसेनेच्यावतीने शहरातील दिल्लीगेट येथे आज (बुधवार) चीनचा झेंडा जाळून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी चायना मेड मोबाईल आणि इतर वस्तू फोडून यापुढे देशप्रेमी भारतीय नागरिकांनी चायना मेड वस्तू विकत घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जला दो जला दो, चीन को जला दो.. भारतीय शहीद जवानांचा बदला घ्या, अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. आपले वीस जवान देशासाठी शहीद झालेत, आता भारताने चीनचे वीस हजार सैनिक मारले पाहिजेत, अशी भावना शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी यावेळी व्यक्त केली. यापुढे देशप्रेमी भारतीय नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. तसेच सध्या वापरात असलेल्या चिनी वस्तू फेकून द्या, असेही राठोड म्हणाले.