औरंगाबाद : 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी आग्र्याच्या किल्ल्यावर सायंकाळी सहा वाजता सोहळ्याला सुरुवात केली जाणार आहे. सुरुवातीला स्वागत सोहळा पार पडेल. त्यानंतर सुरेल गाण्यांची पर्वणी होईल. हा अनमोल क्षण उपस्थित शिवभक्तांना अनुभवायला मिळणार आहे.
बड्या नेत्यांची उपस्थिती लक्षवेधणार : या नियोजीत कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुरातत्व विभागाचे कॅबिनेट मंत्री किशन रेड्डी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. ते उपस्थित शिवभक्तांना आणि जनतेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कामाविषयी माहगिती देतील, मार्गदर्शन करतील. यानंतर नेत्रदीपक आकर्षक अशी आतषबाजीने सोहळा पार पडेल. त्याने या कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमासाठी आग्रा प्रशासनही पूर्णपणे सज्ज झाल्याचे पहायला मिळत आहे. या कार्यक्रमासाठी आग्र्याच्या किल्ल्यात निमंत्रित पाहुण्यांसाठी किल्ला खास रात्री साडेनऊपर्यंत उघडा राहणार आहे.
महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त रवाना : या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी औरंगाबादसह राज्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त शनिवारी आग्र्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही जण विमानाने तर काही रेल्वेने अद्भुत सोहळ्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. त्यात हजारो शिवभक्त आग्र्याकडे रवाना झाले आहेत. या खास रेल्वेत पोवाडा गीत गात, महाराजांचा जयघोष करत, शिवभक्तांनी आग्र्याकडे कूच केली आहे. आग्र्याच्या किल्यात दिवाने-ए-खासच्यासमोर भव्य स्टेज उभारला जातेय. यंदाची शिवजयंती तिथेच साजरी होणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकारने या शिवजयंतीचे आयोजन केले आहे.
शिवजयंती सोहळ्याची सुरवात महाराष्ट्र गीताने : या शिवजयंती सोहळ्याची सुरूवात महाराष्ट्र गीताने होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून कसे महाराष्ट्रात परतले याबाबतचे एक विशेष नाटक या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे. याबाबतची प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा सुद्धा तैनात करण्यात आला आहे.आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ती शिवजयंतीकडे सुरक्षित रित्या पार पडावी याकडे. राज्यात सर्वत्र शिवजयंतीची रेलचेल पहायला मिळत आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. ठिकठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
हेही वाचा :Shiv Jayanti 2023 : प्रत्येक किल्ल्यांवर का असतात शिव मंदिर? पाहा काय आहे इतिहास