अहमदनगर : शिर्डीच्या साई मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका असल्याने साई मंदिराला दुहेरी सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे. साईबाबा मंदिरातील सुरक्षा व्यवस्था साई संस्थान कर्मचारी करतात तर मंदिर परिसराच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्र पोलिसांची कुमक नेमण्यात आली आहे. याचबरोबरीने दररोज बॉम्ब शोधक पथकाडून मंदिराची तपासणी केली जाते. मात्र या सुरक्षा व्यवस्थेऐवजी CISF ची सुरक्षा साईबाबा मंदिराला असावी अशी चर्चा होत होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने साई संस्थानचे म्हणने मागवले आहे.
सुरक्षा व्यवस्थेला मंजुरी : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल नेमणूकीबाबत उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानला म्हणणे मागवले आहे. कदाचित साई संस्थान या सुरक्षा व्यवस्थेला मंजुरी देवु शकते असा, अंदाज ग्रामस्थांना आल्याने ग्रामस्थांनी या विरोधात न्यायालयानी लढा लढण्याचे ठरवले आहे. त्यासाठी निधी जमविण्यासाठी दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांनी भिक्षा झोळी आंदोलनही केले होते.
ग्रामस्थ यांची बैठक पार पडली : आज शिर्डीतील सर्व पक्षीय नेते व ग्रामस्थ यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत प्रामुख्याने साई मंदिराला CISF सुरक्षा नको, तसेच अन्य चार मागण्या घेवुन शिर्डी ग्रामस्थ एक मे महाराष्ट्र दिन पासून शिर्डीशहर बेमुदत बंद आंदोलन सुरू करणार आहे. तसेच 1 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता ग्रामदैवत हनुमान मंदिरा जवळ ग्रामसभा घेवुन पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे शिर्डी ग्रामस्थ नितीन कोते यांनी सांगितले आहे.
शिर्डीत काय सुरू ? काय बंद ?: साईबाबा मंदिर भाविकांनासाठी खुले राहणार आहे. साईबाबा संस्थानचे सर्व भक्त निवास सुरू राहणार आहे. साईबाबा प्रसादलय, भोजनालय सुरू राहणार आहे. तसेच साईबाबा संस्थानच्या सर्व सुविधा भाविकांसाठी सुरू राहणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची राहण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी गेस्ट हाऊस, लॉजिंग सुरू ठेवणार. तर इतर सर्व व्यवसाय पूर्ण पणे बंद ठेवण्यात येणार.
काय आहेत शिर्डीकरांच्या मागण्या: साईबाबा मंदिराला CISF सुरक्षा व्यवस्था नको, आहे तीच सुरक्षा योग्य आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद IAS अधिकारीकडे नको हे पद रद्द करून, शासनाचा उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार, प्रांत अधिकारीकडे असावे. तसेच साईबाबा संस्थानचे सध्या पाहत असलेले तदर्थ समितीमुळे सर्व कारभार मंदावलेला असुन सर्व निर्णय प्रलंबित आहे. तर यावर राज्य शासनाने नियुक्त समिती नेमावी, शिर्डी साईबाबा संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमणुक करण्यात यावे. यात शिर्डीतील 50 टक्के विश्वस्त नेमणूक करावे.