अहमदनगर : सोमवारी सकाळी 8 ते 8.30 च्या दरम्यान जवळपास 60 ते 70 वानरांची टोळी पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या टेकडीवर बसलेली होती. त्यांना हा महामार्ग ओलांडायचा होता. मात्र भरधाव वेगाने वाहने जात असल्याने वानरांना रस्ता ओलांडताना अडचण येत होती. एक वानर रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला वाहनाचा धक्काही लागला. त्यानंतर एका सूज्ञ नागरिकाने ही गोष्ट घारगाव पोलीस व डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांना लक्षात आणून दिली. त्यानंर अवघ्या काळी वेळातच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यापाठोपाठ डोळासणे महामार्ग पोलिसही आले. त्यांनी दोन्ही बाजूंनी वाहनांना नियंत्रित करुन वानरांना महामार्ग ओलांडण्यास मदत केली. पोलिसांच्या या संवेदनशील कृतीचे प्राणीप्रेमी नागरिकांसह प्रवाशांनी देखील कौतुक केले.
वानर बराच वेळ टेकडीवर बसून होते : सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्याने वन्यजीव अन्नपाण्यासाठी भटकंती करु लागले आहे. त्यामुळे पठारभागातील डोंगरदर्यांमध्ये वानर, माकड, बिबटे, तरस, हरीण व इतर वन्यजीव आपले आश्रयस्थान सोडू लागले आहेत. आज सकाळी पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडून वानरांच्या टोळीला दुसर्या वनक्षेत्रात जायचे होते. मात्र, वाहनांचा भरधाव वेग असल्याने त्यांचा नाईलाज झाला. ते बराचवेळ एका टेकडीवर बसून राहिले. हा प्रकार तेथून जाणार्या एका नागरिकाच्या लक्षात आला. त्याने तत्काळ याबाबत घारगाव व डोळासणे महामार्ग पोलिसांना कळविले.
पोलिसांची संवेदनशीलता : त्यानंतर डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे, संतोष खैरे, किशोर लाड, पंढरीनाथ पुजारी यांनी तातडीने धाव घेतली. दरम्यान, एक वानर महामार्ग ओलांडत असताना त्याला वाहनाचा धक्का लागला. तोपर्यंत पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या वाहनांना थांबण्याची सूचना केली. वाहने थांबल्यानंतर वानरांच्या टोळीने पटापट उड्या मारुन महामार्ग अलगदपणे ओलांडला. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली. पोलिसांच्या व या नागरिकाच्या संवेदनशीलतेबद्दल प्रवाशांसह प्राणीप्रेमी नागरिकांनी कौतुक केले आहे.
हेही वाचा : Fire in Nagpur : हिंगणा एमआयडीसीतील भीषण आगीत तिघांचा जळून मृत्यू, आणखी १० ते १२ कामगार अडकल्याची भीती