अहमदनगर - जिल्ह्यातील कोल्हार येथील एका इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत नगर नाशिक जिल्ह्यातील तब्बल 41 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी 44 लाख 17 हजार 79 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रशिक्षणार्थी नगर जिल्ह्यात आलेल्या दोन अधिक्षकांनी पहिली मोठी कारवाई केली.
या घटनेची पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रूक येथील कोल्हार-लोणी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मुदस्सर शकील शेख याच्या इमारतीचे टेरेसवर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील 35 ते 40 लोक एकत्र जमवून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना मिळाली. या माहितीच्या आधारे परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी, परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिलीप पवार यांचासह पोलीस कर्मचारी यांनी कय्यूम करीम शेख याचे इमारतीचे टेरेसवर छापा टाकला.
यावेळी 35 ते 40 व्यक्ती पाच वेगवेगळ्या ठिकाणी गोल करून बसून हातामध्ये पत्ते घेऊन तिरट जुगार खेळत होते. पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी रविवारी रात्री 8 वाजता छापा टाकत जुगार खेळत असलेल्या इसमांना ताब्यात घेतले. या सर्व लोकांची अंगझडती मध्ये 8 लाख 19 हजार 140 रु , 8 लाख रोख रक्कम व 2 लाख 66 हजार रु किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे 32 मोबाईल , 33 लाख रु . किमतीची 7 चारचाकी वाहने व 32 हजार रु.किमतीची दोन मोटार सायकली व तिरट जुगाराची साधने असा एकूण 44 लाख 17 हजार 790 रु. किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त करुन वरील नमुद 41 आरोपी विरुध्द पोना शंकर संपतराव चौधरी (स्थानिक गुन्हे शाखा ,अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरुन लोणी पो.स्टे .येथे गुन्हा 749 / 2020, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल केला.