शिर्डी (अहमदनगर)- शिर्डी बसस्थानकासमोरील शनिवारी सकाळी नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी २४ तासातच तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पैशाच्या कारणातून हा खून करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. शंकर उर्फ अण्णा असे मृताचे नाव आहे. तर राजेंद्र गवळी, सुनील जाधव, सुनील कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानका समोरील सार्वजनिक शौचालयात खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी या तिघांना २४ तासाच्या आत अटक केली. त्यावेळी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, या तिघांनी पैशाची मागणी करत शंकर उर्फ अण्णा याच्यासोबत वाद घातला होता. त्यावेळी वाद टोकाला गेल्याने या तिघांनी मिळून शंकरच्या डोक्यावर दगड आणि रॉडने वार करून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
दरम्यान, तिघा आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.