शिर्डी : शिर्डी नगरपंचायतची निवडणुकीची(Shirdi Nagarpanchayat Election) घोषणा झाली असून 21 डिसेंबरला मतदान तर दुसऱ्या दिवशी 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आचारसंहिताही शहरात लागू झाली आहे. शिर्डी सोबतच जिल्हातील पारनेर, कर्जत व अकोले या नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमही राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
आचारसंहिता लागू
निवडणुकीच्या पार्श्वभूीवर शिर्डी शहरातील विविध राजकीय पक्षांचे फलक झाकण्यात येत असून झेंडेही काढण्यात येत आहेत. आचारसंहिता सुरू झाल्याने सर्व पक्ष, संघटना आणि नागरिकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे. निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी तयारीला लागले आहेत.
निवडणुकीचे वेळापत्रक
शिर्डी नगरपंचायतीसाठी नामनिर्देशन पत्र 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. यामध्ये 4 डिसेंबर, शनिवार व पाच डिसेंबर, रविवार या दिवशी सुट्टी राहणार आहे. तर नामनिर्देशन पत्रांची छाननी 8 डिसेंबरला सकाळी 11 वाजेपासून होणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी 13 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत राहणार आहे. मतदान 21 डिसेंबरला मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 22 डिसेंबरला बुधवारी सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे.
सध्याचे पक्षीय बलाबल
शिर्डी नगरपंचायतमध्ये 17 नगरसेवक आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसला 9, भाजपला 3, राष्ट्रवादी काँग्रेसला 1, शिवसेनेला 1, मनसेला 1 व अपक्षकडे 2 नगरसेवक होते. त्यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसने एकहाती विजय मिळविला होता. आता विखे पाटील भाजपमध्ये आहेत. त्यांच्या बरोबर काँग्रेसचे बहुतांश नगरसेवकही असणार आहेत. अशा स्थिती मागील दोन वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या युवक आघाडीने शिर्डीत पक्ष संघटन मजबूत करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचीही शिर्डीतील काही भागांत ताकद आहे. त्यामुळे शिर्डीत तरी भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत दिसणार आहे.
हेही वाचा - शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती