शिर्डी (अहमदनगर)- दुधाला वाढीव भाव मिळावा यासाठी शेतकरी संघर्ष समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दुधाला 30 रुपये भाव द्या, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर आले आहेत.
दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध करुन आंदोलनाला सुरुवात केली. रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जाणार आहे. केंद्र सरकारने दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, दुधाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करावे, या प्रमुख मागण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. आज झालेल्या आंदोलनात डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे यांचा सहभाग होता.