अहमदनगर - महापौर पदाचा पहिला अडीच वर्षांचा कालावधी संपत असल्याने येत्या 30 जून रोजी महापौर पदासाठी निवडणूक होत आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या टर्मला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर निवडून आला होता. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडी असल्याने सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणे अपेक्षित होते. मात्र, शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसला बाजूला ठेवले जात असल्याची भावना स्थानिक नेत्यांकडून व्यक्त होत आहे. यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागून आहे.
हेही वाचा - कोपरगाव बसस्थानकावर खळबळ, मुलीचे अपहरण करणाऱ्याला नागरिकांचा दणका
मुंबईत झाला सेना-राष्ट्रवादी युतीचा निर्णय; काँग्रेसकडे दुर्लक्ष
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक येत्या 30 जूनला घोषित करण्यात आली आहे. महापालिकेतील सत्तेसाठीचा जादुई आकडा महा विकासआघाडीकडे आहे. 68 नगरसेवक असलेल्या अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेनेचे 23, राष्ट्रवादी काँग्रेसचे 19 आणि काँग्रेस पक्षाचे पाच, असे आघाडीचे तब्बल 47 नगरसेवकांचे बळ आहे. महापौर निवडणुकीबाबत 22 जूनला मुंबईत झालेल्या बैठकीत सर्वाधिक तेवीस नगरसेवक असलेल्या शिवसेनेला महापौर पद देण्याचे ठरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत भेटून या दोन्ही पक्षात युती झाल्याचे सांगण्यात आले. त्या बैठकीचे फोटोही व्हायरल झाले. मात्र, या बैठकीला ना काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते, ना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची मुंबईला गेलेल्या सेना-भाजपच्या नेत्यांनी भेट घेतली.
उमेदवार आणि संख्याबळ नसल्याने भाजप घेणार तटस्थ भूमिका
महापौरपद हे अनुसूचित जाती जमाती महिलेसाठी राखीव असून भाजपकडे या वर्गातील उमेदवारही नाही आणि निवडून येण्यासाठीचे संख्याबळही नाही. त्यामुळे, सध्या तरी भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे. मात्र, ऐन वेळी पडद्याआड काही नवीन समीकरणे तयार झाल्यास पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने निर्णय घेतला जाईल, असे मावळते महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्पष्ट केले.
2018 साली झालेल्या महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे 15 नगरसेवक निवडून आले. मात्र, भाजपने त्यावेळी सेना-भाजप युतीचा धर्म न निभावता स्थानिक पातळीवर असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या टोकाच्या विरोधाचा फायदा उठवत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापौर आणि उपमहापौरपद मिळवत, अडीच वर्षांसाठी सत्ता स्थापन केली. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी नगरसेवकांनी घेतलेल्या या भूमिकेवर त्यावेळी मोठी चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व एकोणाविस नगरसेवकांना पक्षातून काही काळ निलंबित केले होते. त्यावेळी या सर्व घडामोडींमागे आमदार संग्राम जगताप असल्याचे बोलले जात असले, तरी पक्षाने त्यांना क्लिनचिट दिली होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय गणिते बदलली असून आता महाविकास आघाडी धर्म पाळत शिवसेनेचा महापौर पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
काँग्रेस महापौर पदाच्या शर्यतीत; थोरात अंतिम निर्णय घेणार
राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेसची फरफट होत असल्याची तक्रार ज्या पद्धतीने होत असल्याचे सांगितले जात आहे, त्याच पद्धतीने अहमदनगरमध्ये काँग्रेसची परिस्थिती दिसून येत आहे. मुंबईत झालेल्या बैठकीला काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना बोलविण्यात आले नव्हते, अशी भावना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून व्यक्त होत आहे. काँग्रेसचे महानगरपालिकेत केवळ पाच नगरसेवक असले तरी पक्षाकडे अनुसूचित जाती-जमाती महिला या आरक्षित पदासाठी शीला चव्हाण या उमेदवार असल्याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य पातळीवर महापौर पद काँग्रेसला मिळावे, यासाठी आग्रह कायम ठेवला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी घेतल्याचेही बोलले जात आहे. नगरच्या महापौर पदाच्या बदल्यात राज्यातील इतर ठिकाणी पक्ष आघाडी धर्म पाळून मदत करेल, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचेही सांगितले जात आहे.
प्रत्यक्षात आतापर्यंत नगर महापौर पदाबाबत झालेल्या बैठकांत थोरातांना बोलावण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेस नगरसेवक आणि नेत्यांना आता पर्यंत विचारात घेतले न गेल्याने काँग्रेस नेते संतापले आहेत. मात्र, स्थानिक काँग्रेसची सर्व भिस्त ही बाळासाहेब थोरतांवर असून, ते जो आदेश देतील, तो मान्य करू, असे दीप चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसचे स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक असलेल्या दीप चव्हाण यांच्या पत्नी शिला चव्हाण या विद्यमान नगरसेविका असून त्यांना महापौर पद मिळावे यासाठी थोरात प्रयत्नशील आहेत.
सत्ता आघाडीची की, युतीची यावर उत्सुकता
शिवसेनेने महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांची उमेदवारी अंतिम केल्याचे बोलले जाते, तर महापालिकेत केवळ पाच नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या काँग्रेसच्या शीला चव्हाण यांच्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात आग्रही आहेत. मात्र, निवडणूकपूर्व हालचालीत काँग्रेसलाच बाजूला ठेवल्याची परिस्थिती असताना होणारा महापौर हा महाविकास आघाडीचा होणार की, सेना-राष्ट्रवादी युतीचा होणार, याकडे आता नगरकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - भावाच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून, कोपरगावातील धक्कादायक घटना