अहमदनगर - नायलॉन मांजाची अवैध विक्री केल्याप्रकरणी कोपरगाव शहरातील एका विक्रेत्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरोबानगर येथील रवींद्र अण्णा वाघ (वय २७), असे आरोपी विक्रेत्याचे नाव आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ हे गस्त घालत असताना त्यांना काही मुलांकडे नायलॉनचा मांजा आढळून आला. त्यांनी मुलांकडे अधिक चौकशी करून मांजा विकणाऱ्या दुकानदाराला ताब्यात घेतले. या आरोपीविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बी.एस.कोरेकर करत आहेत.
हेही वाचा - नायलॉनच्या मांजात अडकून घुबड जखमी; मांजावर बंदी घालण्याची पक्षीप्रेमींची मागणी
नायलॉन मांजामुळे पशुपक्षांसह नागरिकांना इजा पोहोचल्याच्या, प्रसंगी मृत्यू झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे, नायलॉनच्या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. कोपरगावातच गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नायलॉन मांजामुळे संजीवनी साखर कारखान्याच्या एका कामगाराचा गळा कापला होता. तर, काही वर्षांपूर्वी कोपरगाव बेट भागात एका दुचाकीस्वाराचा मांजामुळेच मृत्यू झाल्याची घटनादेखील घडली होती. राज्यात अशा इतरही घटना घडल्या आहेत. तरी, अनेक ठिकाणी अवैधरित्या या मांजाची विक्री होते.