अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे अधिकारी नाशिकहुन चार दिवसांपूर्वी राळेगणसिद्धीमध्ये पुन्हा कामावर हजर झाले होते. दरम्यान, त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित सुरक्षा अधिकारी हे नाशिकचे आहेत. ते आता पुन्हा नाशिकला परतले आहेत. तेथे त्यांनी आरटीपीसीआर चाचणी केली आहे. मात्र, अद्याप त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
अण्णांच्या संपर्कात ते अधिकारी नाही -
दरम्यान, अँटिजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेले अधिकारी हे अण्णांच्या संपर्कात आले नव्हते. तसेच अण्णा हे सुरक्षा अधिकाऱ्यांसह इतर सर्वांच्या पासूनच शारीरिक अंतर ठेवून रोजचे कामकाज करतात, अशी माहिती संबंधितांनी दिली. नाशिकहून आलेले अधिकाऱ्यांना आल्यापासून त्रास जाणवू लागल्याने ते कुणाच्याही संपर्कात आले नव्हते, असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : सचिन वझेंची नियंत्रण कक्षात बदली
अण्णांना राज्य सरकारकडून झेड प्लस सुरक्षा -
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना राज्य सरकारच्या वतीने झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे अण्णांच्या अवतीभवती तसेच ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणी सुरक्षारक्षकांचा विशेष ताफा असतो. अण्णांना भेटण्यास देशभरातून रोज अनेक लोक राळेगणसिद्धीमध्ये येत असतात. त्यावेळेस अण्णांसोबत फोटो काढणे, सेल्फी घेणे यासाठी अनेकांची इच्छा असते. या गर्दीत अण्णांच्या सुरक्षेला कोणताही धोका असू नये म्हणून अण्णांच्या अवतीभवती असलेले सुरक्षा पथकातील कमांडो हे कार्यकर्ते आणि नागरिकांना अण्णांपासून सतत दूर ठेवत असतात. मात्र, हे सुरक्षा अधिकारी अण्णांच्या आजूबाजूला सतत असल्याने अण्णांची ही अनेकदा नाराजी दिसून आलेली आहे. आपल्याला सुरक्षा नको आहे असेही त्यांनी अनेकदा सरकारकडे लेखी पत्र पाठवून सांगितले आहे. मात्र, तरीदेखील सरकारने अण्णांची सुरक्षा कायम ठेवलेली आहे.